मुंबई : गेल्या काही वर्षात आपण पाहातोय की आपल्याकडे पावसाची सुरुवात आता चक्रीवादळाने होत आहे. प्रत्येकवेळी नुकसान होतं. पंचनामे होतात. नुकसानभरपाई कशी होते? तत्काळ मदतही करावी लागते. पण जनतेसमोर खोटं बोलून, त्यांना खोटा धीर मी कधीच देणार नाही. मग माझ्यावर किती टीका झाली तरी चालेल, असं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. ते राज्याच्या विधानमंडळ सचिवालयात आयोजित विधानसभा प्रतिनिधींच्या कार्यशाळेत बोलत होते.
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे आमदारांसाठी ‘राज्याचा अर्थसंकल्प-माझ्या मतदारसंघाच्या संदर्भात’ ही दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे. यावेळी सर्व आमदारांना संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. यात नैसर्गिक आपत्ती आणि कोरोनामुळे झालेल्या नुकसानीबाबत सरकारनं केलेल्या कामांची माहिती दिली. तसंच जनता विश्वासानं प्रतिनिधींना विधीमंडळात आपले विषय मांडण्यासाठी पाठवते याचं भान प्रत्येकानं राखलं पाहिजे. तुमची सभागृहातील वागणूक आणि संसदीय भाषा कशी वापरता यावर तुमचं व्यक्तीमत्त्व दिसून येतं. तुम्ही जे सभागृहात बोलता ते जर केलं नाही तर जनता तुम्हाला घरी बसवेल याची जाणीव ठेवायला हवी, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
राज्याचा अर्थसंकल्प एका ठिपक्यांच्या रांगोळीसारखाच आहे. रांगोळीचे ठिपके म्हणजे राज्याच्या जनतेनं निवडून दिलेले प्रतिनिधी असतात. रांगोळीचे ठिपके योग्यरितीनं एकमेकांशी जोडले गेले की रांगोळी पूर्ण होते. त्यात रंग भरले की ती आकर्षक होते. असंच राज्याच्या विकासाचं देखील आहे. सर्व प्रतिनिधींनी मिळून काम केलं तरच राज्याचा विकास साध्य करता येऊ शकतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
राज्यासह संपूर्ण जगभरातच आतापर्यंत आरोग्य सुविधांकडे हवं तसं लक्ष दिलं जात नव्हतं, ते आज एखा विषाणूनं सिद्ध करुन दाखवलं. कोरोना विषाणूनं वास्तवाची जाणीव करुन दिली. शिक्षण क्षेत्राच्याबाबतीतचं तसं आहे. पण गेल्या दीड वर्षात आपण जगात कुठेही नसेल अशा आरोग्य सुविधा उपलब्ध करुन दिल्या. याचा आकडा समोर आला पाहिजे. कोरोना काळात इतर गोष्टींचे निधीही आरोग्य सुविधांकडे वळवावे लागले. याची संपूर्ण माहिती सविस्तर स्वरुपात समोर आली पाहिजे. जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं.