अखेर आयपीएलचे वेळापत्रक जाहीर; ९ एप्रिलपासून सुरुवात; ३० मे रोजी अंतिम सामना
एका क्लिकवर पहा वेळापत्रक

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२१ला ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. चेन्नईत उद्घाटनाचा सामना खेळवला जाईल. तब्बल पाच वेळा स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सचा मुकाबला विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होईल. कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्यानं बीसीसीआयनं आयपीएलसाठी सहा स्टेडियम्सची निवड केली आहे. यामध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमचा समावेश आहे. गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर प्ले-ऑफ आणि अंतिम सामना खेळवला जाईल.
आयपीएल २०२१ मध्ये आठ संघ असतील. प्रत्येक संघ चार स्टेडियमवर सामने खेळेल. एकूण ५६ सामने खेळवण्यात येतील. चेन्नई, मुंबई, कोलकाता आणि बंगळुरूत प्रत्येकी १० सामने रंगतील. तर अहमदाबाद आणि दिल्लीत प्रत्येकी ८ सामने होतील. यंदाच्या आयपीएलमध्ये होम ग्राऊंड नसेल. म्हणजेच कोणत्याही संघाला घरच्या मैदानावर सामने खेळायला मिळणार नाहीत. सर्व संघांचे सामने त्रयस्थ ठिकाणी होतील. प्रत्येक संघाला ६ स्टेडियमपैकी ४ स्टेडियम्सवर खेळण्याची संधी मिळेल.
आयपीएल २०२१ मध्ये ११ डबल हेडर असतील. म्हणजे एकाच दिवशी दोन सामने असतील. दुपारचे सामने साडे तीन वाजता सुरू होतील. तर संध्याकाळचे सामने साडे सात वाजता सुरू होतील. गेल्याच वर्षी बीसीसीआयनं यूएईमध्ये आयपीएलचं आयोजन केलं होतं. देशात कोरोनाचा प्रादर्भाव वाढल्यानं आयपीएल स्पर्धा यूएईमध्ये आयोजित केली गेली. यानंतर आता भारतात सुरक्षितपणे स्पर्धा आयोजित करण्याचा विश्वास बीसीसीआयनं व्यक्त केला आहे.