राज्यात १ जूनपासून ‘रेड झोन’ वगळता लॉकडाऊन शिथिल होण्याचे संकेत

मुंबई : राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये घट होत असल्याने आता १ जूननंतर लॉकडाऊन शिथिल करणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. इतकेच नाहीतर राज्यात रेड झोन असलेल्या १४ जिल्ह्यांना वगळता इतर ठिकाणी नियम शिथिल करण्यात येणार आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याची माहिती समोर आल्यानंतर आता १ जूननंतर लॉकडाऊन हटवणार का? असा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. यावर विजय वडेट्टीवार यांनी महत्वाचे संकेत दिले आहे. राज्यातील १४ जिल्ह्यांना रेड झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. या जिल्ह्यांमध्ये कडकडीत लॉकडाऊन असले तरी कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट होताना दिसत नाही. त्यामुळे हे १४ जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये १ जूननंतर लॉकडाऊन शिथिल करण्यात येतील.
सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा तूर्त बंद
अत्यावश्यक सेवा देणार्यांसाठी सध्या लोकल सुरू असून अजून पुढचे १५ दिवस तरी नागरिकांना लोकलने प्रवास करता येणार नाही, असे ते म्हणाले. कोरोनाचा धोका कमी होत असला तरी लोकल सुरू झाली तर मोठ्या प्रमाणात गर्दी वाढेल. त्यामुळे सध्या लोकल मर्यादित नागरिकांसाठीच असणार असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.
रेड झोनमध्ये १५ जिल्हे
अहमदनगर, उस्मानाबाद, बुलढाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, यवतमाळ, अमरावती, सोलापूर, अकोला, वाशीम, बीड, गडचिरोली.