औरंगाबाद : औरंगाबाद महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप युती होण्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांनी औरंगाबादच्या भाजप शहाराध्यक्षांची चक्क घरी जाऊन भेट घेतली. त्यामुळे येणाऱ्या काळात दोन्ही पक्ष युती करण्याची शक्यता बळावली आहे.
मंत्री अब्दुल सत्तार यांनी औरंगाबादचे भाजप शहराध्यक्ष संजय केनेकर यांची थेट घरी जाऊन भेट घेतल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. भाजप-शिवसेना युतीसाठी अब्दुल सत्तार सक्रिय झाल्याची चर्चा आधीपासून होती. काही दिवसांपूर्वी अब्दुल सत्तार यांनी केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांची भेट घेत युतीचे संकेत दिले होते. औरंगाबादमध्ये स्थानिक पातळीवर शिवसेना आणि भाजप नेते महापालिकेत युतीसाठी इच्छुक आल्याची सूत्रांची माहिती आहे. अगदी पाच महिन्यांवर येऊन ठेपलेल्या औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी युतीची तयारी होताना दिसत आहे.
भाजप-शिवसेना युतीची सत्ता गेली ३० वर्षे औरंगाबाद महापालिकेवर आहे. मात्र राज्यातील युती तुटल्यापासून औरंगाबाद महापालिकेतही याचे पडसाद जाणवू लागले. भाजपच्या विजय औताडे यांनी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात उपमहापौरपदाचा राजीनामा दिला होता. मात्र महाविकास आघाडीमुळे औरंगाबाद महापालिकेत उपमहापौरपद खेचून आणण्यात शिवसेनेला यश आलं. औरंगाबादच्या उपमहापौरपदी शिवसेनेच्या राजेंद्र जंजाळ यांची निवड झाली.
औरंगाबाद महापालिकेत मनसे आणि भाजप युती होण्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. २०१५ च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक यंदाही बहुरंगी होण्याची चिन्हं आहेत. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असली, तरी औरंगाबादेतील सत्ताधारी शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीला सोबत न घेता रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यांच्यासमोर भाजप, एमआयएम या पक्षांचं आव्हान असेल. तर मनसेही पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहे.