
टोक्यो : ऑलिम्पिक इतिहासात पहिल्यांदाच उपांत्य फेरीत प्रवेश करत भारताच्या महिलांच्या हॉकी टीमनं इतिहास रचला होता. भारताच्या या ऐतिहासिक प्रवासाला अर्जेंटीनानं ब्रेक लावला आहे. सेमी फायनलमध्ये भारताची लढत अर्जेंटीनाशी होती. या मॅचमध्ये अर्जेंटीनानं भारताचा २-१ ने पराभव केला आहे.
या मॅचमध्ये भारताच्या गुरजीत कौरनं पहिला गोल करत टीमला आघाडी मिळवून दिली. गुरजीतनं पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. या गोलमुळे पहिल्या क्वार्टरमध्ये भारतानं अर्जेंटीनावर आघाडी घेतली होती. दुसऱ्या क्वार्टरमध्ये अर्जेंटीनानं गोल करत बरोबरी साधली. त्यानंतर दोन्ही टीमनं भक्कम बचाव करत एकमेकांचे पेनल्टी कॉर्नर रोखले. पहिल्या हाफनंतर दोन्ही टीम १-१ ने बरोबरीत होत्या.
तिसऱ्या क्वार्टरमध्ये अर्जेंटीनानं आक्रमक सुरुवात केली. भारताच्या गोल क्षेत्रात त्यांनी सातत्यानं हल्ले केले. याचा फायदा अर्जेंटीनाला झाला. अर्जेंटीनानं दुसरा गोल करत आघाडी घेतली. तिसऱ्या क्वार्टरच्या अखेरीस अर्जेंटीनाकडं २-१ अशी आघाडी होती. चौथ्या क्वार्टरमध्ये भारतानं गोल करण्याचे जोरदार प्रयत्न केले. मॅच संपण्यास १० मिनिटं बाकी असताना भारताला गोल करण्याची चांगली संधी होती. मात्र त्यावेळी अर्जेंटीनाच्या गोल किपरनं तो प्रयत्न रोखला. त्यानंतरही भारतानं गोल करण्याचे जोरदार प्रयत्न केले. मात्र त्यांना यश मिळाले नाही. आता भारतीय टीमला ब्रॉन्झ मेडलसाठी खेळावं लागणार आहे.
भारतीय महिला टीमनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा १-० ने पराभव करत सेमी फायनलमध्ये धडक मारली होती. ऑलिम्पिक स्पर्धेत तीन वेळा गोल्ड मेडल जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारतानं इतिहास रचला होता. त्यापूर्वी साखळी सामन्यात पहिले तीन सामने सलग पराभूत झाल्यानंतर भारतीय टीमनं जोरदार कमबॅक केलं. आधी आयर्लंड आणि नंतर दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारतीय महिलांनी क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला होता.