Top Newsस्पोर्ट्स

रिषभ पंत वगळता भारतीय फलंदाजांची हाराकिरी; दक्षिण आफ्रिकेचे दमदार प्रत्युत्तर

चौथ्या दिवशी लागणार मालिकेचा निकाल

केप टाऊन : रिषभ पंतच्या ऐतिहासिक शतकानं टीम इंडियाची लाज वाचवली खरी, परंतु दक्षिण आफ्रिकेकडून तितकेच तोडीसतोड प्रत्युत्तर मिळाले. डीन एल्गर व किगन पीटरसन यांनी दुसऱ्या विकेटसाटी केलेल्या दमदार भागीदारीनं भारतीय खेळाडूंना तणावात ठेवले. अखेरच्या षटकात जसप्रीत बुमराहनं ही जोडी तोडली, परंतु अजूनही आर-पारची लढाई संपलेली नाही. विराट कोहली त्याच्या नेहमीच्या आक्रमक पवित्र्यात दिसल्यानं भारतीय चाहते आनंदात असले तरी क्रिकेट चाहत्यांना त्याचं हे वागणं न पटणारे आहे. तिसऱ्या दिवसअखेर आफ्रिका फ्रंटसीटवर दिसत असली तरी चौथ्या दिवशी काय होईल याचा अंदाज बांधणे अवघड आहे. रिषभच्या शतकामुळे टीम इंडियाला आफ्रिकेसमोर आव्हानात्मक लक्ष्य उभं करता आलं.

तिसऱ्या दिवसअखेर डीन एल्गरच्या रुपाने भारताला महत्त्वाची विकेट मिळाली. दिवसातील शेवटच्या चेंडूवर बुमराहने एल्गरला (३०) धावांवर ऋषभ पंतकरवी झेलबाद केले. पण आफ्रिका २ बाद १०१ अशा सुस्थितीत आहे. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १११ धावांची गरज आहे. सध्या आफ्रिकेचे फलंदाज ज्या पद्धतीची फलंदाजी करतायत, ते पाहून विजयाच पारड त्यांच्या बाजूने झुकलेलं आहे, असंच म्हणाव लागेल. कारण मार्कराम, एल्गर तंबूत परतले असले, तरी पीटरसन, डुसें, बावुमा अजून बाकी आहेत.

या तिघांनी या मालिकेत भारताला सहजासहजी आपली विकेट मिळू दिलेली नाही. २९ वर्षानंतर विराटच्या संघाला दक्षिण आफ्रिकेत मालिका विजयाचे स्वप्न साकार करायचे असेल, तर गोलंदाजी आणि फिल्डिंगमध्ये भारतीय संघाला विशेष कमाल करुन दाखवावी लागेल. खरंतर एल्गर आणि पीटरसनने शमी, बुमराह, ठाकूर, उमेश यादव यांच्या तोफखान्यासमोर ज्या पद्धतीची फलंदाजी केली, त्यातून भारतीय फलंदाजांनी बोध घेतला पाहिजे. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी जलदगतीने ७७ धावांची भागीदारी केली.

भारतानं दुसऱ्या डावात १९८ धावा करताना आफ्रिकेसमोर विजयासाठी २१२ धावांचे लक्ष्य ठेवले. मार्को येनसन ( ४-३८), कागिसो रबाडा ( ३-५३) आणि लुंगी एनगिडी ( ३-२१) यांनी सुरेख कामगिरी केली. प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या आफ्रिकेला मोहम्मद शमीनं झटका दिला. एडन मार्कराम ( १६) याला शमीनं पुन्हा एकदा बाद करून आफ्रिकेला २३ धावांवर पहिला धक्का दिला. पण, त्यानंतर एल्गर व पीटरसन यांनी भारतीय गोलंदाजाचा धैर्यानं सामना केला. समोरून भारतीय गोलंदाज आग ओकत असताना यष्टिंमागून रिषभ पंत व विराट कोहली आफ्रिकन गोलंदाजांच एकाग्रता भंग करण्यासाठी सारे प्रयत्न करताना दिसले. दोघंही सुसाट स्लेजिंग करत होते. एल्गरला २२ धावांवर असताना आर अश्विननं पायचीत केले, परंतु त्यानं डीआरएस घेतला. त्यात चेंडू यष्टिंवरून जात असल्याचे रिप्लेत दिसताच विराटचा पारा चढला… एल्गरला जीवदान मिळाले.

आता दोन्ही संघांना विजयाची समान संधी आहे, असे म्हणता येणार नाही. कारण पारडं आफ्रिकेच्या बाजूने झुकलेलं आहे. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करुन भारताला मोठी धावसंख्या उभारु दिली नाही. अपवाद फक्त ऋषभ पंतच्या शतकाचा. ऋषभच्या शतकी खेळीमुळे भारताला दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २१२ धावांचे लक्ष्य ठेवता आले. विराट आणि ऋषभ आज खेळपट्टीवर उभे राहिले नसते, तर कदाचित आजच दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला असता.

विराटने पंतसोबत पाचव्या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी केली. विराटने फक्त २९ धावा केल्या. पण खेळपट्टीवर टिकून राहिला. अन्य फलंदाज फक्त हजेरीवीर ठरले. पुजारा-रहाणे यांनी मोक्याच्याक्षणी विकेट गमावून संघाला आणखी अडचणीत आणलं.

विराट माघारी परतल्यानंतर रिषभनं परिपक्व खेळ करताना समाधानकारक पल्ला गाठून दिला. त्यानं १३९ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह नाबाद १०० धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेत शतक झळकावणारा तो पहिला आशिआई यष्टिरक्षक-फलंदाज ठरला. त्यानं महेंद्रसिंग धोनीचा २०१०साली नोंदवलेलाही विक्रम मोडला.

लोकेश राहुल ( १०), मयांक अग्रवाल ( ७), चेतेश्वर पुजारा ( ९) आणि अजिंक्य रहाणे ( १) हे माघारी परतल्यानं भारताची अवस्था ४ बाद ५८ अशी झाली होती. पण, रिषभ व विराटनं टीम इंडियाचा डाव सावरला. रिषभ मागून येऊन अर्धशतक पूर्ण केले आणि विराटनं दुसऱ्या बाजूनं संयमी खेळ करून त्याला साथ दिली. पण, लंच ब्रेकनंतर भारताला पाचवा धक्का बसला. १४३ चेंडूंत २९ धावा करणारा विराट कोहली परतला माघारी परतला अन् रिषभ पंतसोबतची ९४ धावांची भागीदारी संपुष्टात आली.विराट माघारी परतला अन् भारताची गाडी घसरताना दिसली. आक्रमक मोडमध्ये असलेल्या रिषभला मग बचावात्मक खेळ करावा लागला. एका बाजूनं तो डाव सावरून होता, परंतु समोर विकेट पडल्या. आर अश्विन ( ७), शार्दूल ठाकूर (५) व उमेश यादव (०) हे झटपट माघारी परतले. ८८ धावांवर असताना रिषभला जीवदान मिळालं, महाराजनं झेल सोडला. मोहम्मद शमी बाद झाल्यानंतर रिषभ आक्रमक फटकेबाजी करू लागला. ९४ धावांवर त्याला टेम्बा बवुमाकडून जीवदान मिळाले अन् त्यानं सोडलेला चेंडू चौकार गेला. रिषभनं १३१ चेंडूंत शतक पूर्ण केलं. रिषभच्या या अविश्वसनीय खेळीनंतर भारतीय गोलंदाजांकडून उल्लेखनीय कामगिरीची अपेक्षा होती, पण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर व किगन पीटरसन चांगले खेळले.

दक्षिण आफ्रिकेत एकाच कसोटी डावात दोन किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारणारा रिषभ पंत पहिला भारतीय फलंदाज ठरला. शिवाय त्यानं आफ्रिकेत कसोटी डावात सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी करणाऱ्या भारतीय यष्टिरक्षक-फलंदाजाचा विक्रम नावावर केला. २०१०मध्ये महेंद्रसिंग धोनीनं सेंच्युरियन कसोटीत ९० धावा केल्या होत्या आणि रिषभनं तो विक्रम आज मोडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button