Top Newsस्पोर्ट्स

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – आजपासून कसोटी मालिकेचा प्रारंभ

सेंच्युरियन : भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची आजपासून सुरुवात होणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका दरम्यान कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना हा ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामना म्हणून ओळखला जाणार आहे. सेंच्युरियनवर हा सामना होणार आहे. मागील २९ वर्षांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर टीम इंडियाला कसोटी मालिका जिंकता आली नाही. त्यामुळे या दौऱ्यात विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया इतिहास रचणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

पहिल्या कसोटीसाठी अंतिम संघ निवड करताना कर्णधार विराट कोहलीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. खेळपट्टी पाहून टीम इंडिया पाच गोलंदाजांसह मैदानात उतरू शकते. यामध्ये चार जलदगती आणि एक फिरकीपटू असण्याची दाट शक्यता आहे. टीम इंडियाकडून के.एल. राहुल आणि मयांक अग्रवाल सलामीची जोडी म्हणून येऊ शकतात. त्यांच्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा असतील. पाचव्या क्रमांकासाठी कोणाला संधी मिळणार यावर अनेक चर्चा सुरू आहेत. अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर आणि हनुमा विहारी पाचव्या क्रमांकासाठी दावेदार आहेत. यष्टिरक्षक म्हणून ऋषभ पंतची निवड निश्चित असल्याचे मानले जात आहे. त्यानंतर फिरकीपटू आर. अश्विन याला संधी मिळू शकते. अश्विनवर अष्टपैलू खेळाडूची जबाबदारी असणार आहे. त्याशिवाय, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज यांना टीम इंडियात संधी मिळू शकते.

सामन्याच्या पहिल्या दोन दिवसात खेळपट्टी गोलंदाजासाठी अनुकूल असण्याची शक्यता आहे. तिसऱ्या दिवसानंतर फलंदाजी करणे सोपं होईल असे म्हटले जात आहे. खेळपट्टीकडून वेगवान गोलंदाजांना चांगली मदत होईल. फिरकीपटूंना सामन्याच्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी खेळपट्टीकडून मदत मिळण्याची शक्यता आहे. कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पहिल्या दिवशी पाऊस होण्याची शक्यता ६० टक्के आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button