
मुंबई : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर प्रथमच मैदानावर उतरलेल्या विराट कोहलीची फलंदाजी पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या चाहत्यांची निराशा झाली. अम्पायरच्या वादग्रस्त निर्णयामुळे विराटला शून्यावर माघारी परतावे लागले. पण, मयांक अग्रवाल व शुभमन गिल यांच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियानं दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी वर्चस्व गाजवले. विलंबानं सुरू झालेल्या या सामन्यात मयांकनं शतकी खेळी करून टीम इंडियाला मजबूत स्थितित आणले. मयांकचे हे चौथे कसोटी शतक ठरले. श्रेयस अय्यर व वृद्धीमान सहा यांची मयांकला चांगली साथ मिळाली. मयंक अग्रवालच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने २०० चा आकडा पार केला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या ४ बाद २२१ धावा झाल्या. मयांक २४६ चेंडूंचा सामना करताना १४ चौकार व ४ षटकारांसह १२० धावांवर, तर सहा २३ धावांवर खेळत आहेत. न्यूझीलंडकडून एजाझ पटेलनं चार विकेट्स घेतल्या.
सध्या दोन्ही संघामध्ये दुसऱ्या कसोटी सामन्याचा थरार सुरू आहे. दोन सामन्यांच्या मालिकेचा हा शेवटचा आणि निर्णायक सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडत आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मयांक व शुभमन गिल यांनी टीम इंडियाला दमदार सुरूवात करून दिल्यानंतर न्यूझीलंडच्या एजाझ पटेल यानं सामनाच फिरवला. बिनबाद ८० धावांवरून टीम इंडियाची अवस्था ३ बाद ८० अशी केली. चेतेश्वर पुजाराला डीआरएसमुळे जीवदान मिळूनही तो भोपळ्यावर बाद झाला. त्याच षटकात पटेलनं टीम इंडियाला मोठा धक्का दिला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर पहिलाच सामना खेळणाऱ्या विराटला भोपळ्यावर माघारी जावं लागलं. २८व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर पटेलनं टीम इंडियाला पहिला धक्का दिला. गिल ७१ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ४४ धावांवर झेलबाद झाला.
सातत्यानं अपयशी ठरत असलेल्या पुजाराकडे साऱ्यांच्या नजरा खिळल्या होत्या. ३० व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर पुजारासाठी पटेलनं पायचीतचे अपील केले. मैदानावरील पंचांनी नाबाद दिले आणि त्याविरोधात किवी खेळाडू तिसऱ्या अम्पायरकडे गेले. पण, त्यात पुजारा नाबाद असल्याचे स्पष्ट झाले अन् त्यांचा डीआरएस वाया गेला. पण, पटेलनं टाकलेल्या पुढच्याच चेंडूवर पुजारानं पुढे येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु तो पॅडला लागून यष्टिंवर आदळला. त्यानंतर त्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर विराटसाठी पायचीतचे जोरदार अपील झाले. त्याला बाद दिलं गेलं. तिसऱ्या अम्पायरनंही मैदानावरील अम्पायरचा निर्णय कायम राखला.
भारतीय कर्णधार सर्वाधिक सहा वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम विराटनं नावावर करताना मन्सूर अली खान पतौडी (५) यांचा विक्रम मोडला. कानपूर कसोटी गाजवणाऱ्या श्रेयस अय्यरनं घरच्या खेळपट्टीवर तुफान फटकेबाजी करेल असे वाटले होते. त्यानं मयांकसह चौथ्या विकेटसाठी १०६ चेंडूंत ८० धावा जोडल्या, पण त्यात श्रेयसच्या (१८) धावांचाच हातभार लागला. एजाझनंच हा चौथा धक्का दिला. कानपूर कसोटीच्या दुसऱ्या डावात महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी करणाऱ्या वृद्धीमान सहानं मुंबई कसोटीत मयांकला तोडीसतोड साथ देताना अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली.
पंचाच्या चुकीच्या निर्णयानंतर विराटचा संताप
विश्रांतीनंतर पुनरागमन करत असलेला कर्णधार विराट कोहली देखील काही खास करू शकला नाही आणि खाते न उघडताच माघारी परतला. एजाझ पटेलच्या चेंडूवर भारताचा कर्णधार एलबीडब्ल्यू बाद झाला. मात्र तो खूप वादाचा निर्णय ठरला आहे. विराट कोहलीला बाद दिल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. खुद्द विराट कोहली देखील टीव्ही अंपायरच्या निर्णयावर हैराण झाला होता. हा पूर्ण प्रकार भारताच्या डावातील ३० व्या षटकात झाला. एजाझ पटेलचा चेंडू पहिल्यांदा पॅडवर लागला आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंनी अपील केल्यानंतर पंच अनिल चौधरी यांनी कोहलीला बाद घोषित केले.
पंच अनिल चौधरी यांनी बाद घोषित केल्यानंतर लगेचच कोहलीने तिसऱ्या अंपायरकडे धाव घेतली. मात्र रिप्लेमध्ये समजले की कोहलीच्या बॅटला चेंडूचा स्पर्श झाला होता. मात्र हे पाहणे कठीण होते की चेंडू पॅडला लागायच्या अगोदर बॅटला लागली की दोन्हींचा संपर्क एकसाथ झाला. तिसरे अंपायर वीरेंद्र शर्मा यांनी मैदानावरील पंचाच्या निर्णयावर जाण्याचे योग्य समजले आणि बाद घोषित करण्यात केले.
तिसऱ्या अंपायरने बाद घोषित केल्यानंतर कोहली लगेचच मैदानावरील फिल्डिंग अंपायर नितिन मेनन यांच्याकडे गेला. दोघांमध्ये खूप वेळ चर्चा झाली. त्याच्यानंतर कोहली मोठी पाऊले टाकत मैदानातून बाहेर गेला. ड्रेसिंगरूमकडे जाताना कोहली खूप रागात दिसला आणि त्याने बाउंड्री लाइनवर त्याची बॅट जोरात आपटली.