मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घराबाहेरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. एका टॅक्सी ड्रायव्हरने मुंबई पोलिसांना केलेल्या फोननंतर अँटिलियाबाहेरची सुरक्षा वाढवली आहे. दोन अज्ञात व्यक्ती अंबानींच्या अँटिलिया घराविषयी माहिती मागत असल्याचे टॅक्सी ड्रायव्हरने मुंबई पोलिसांना सांगितले. त्याचप्रमाणे त्या दोन अज्ञात व्यक्तींच्या हातात एक बॅग असल्याचे देखील टॅक्सी ड्रायव्हरने सांगितले आहे. इंडिया डुटेने दिलेल्या माहितीनुसार, टॅक्सी ड्रायव्हरकडे अज्ञात व्यक्तींनी अँटिलियाबाबत चौकशी केल्यानंतर त्याने याची माहिती पोलिसांना दिली टॅक्सी ड्रायव्हरने दिलेल्या माहितीची दखल घेत त्वरित अँटिलिया आणि आजूबाजूच्या परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
टॅक्सी ड्रायव्हरने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला दिलेल्या माहितीनुसार, एका दाढीवाल्या अज्ञात व्यक्तीने किल्ला कोर्टाच्या समोर त्याला अँटिलियाविषयी माहिती विचारली. अँटिलिया बंगल्याचा पत्ता आणि आजूबाजूच्या परिसराविषयी माहिती विचारली. त्याच्यासोबत आणखी एक माणूस होता. त्याच्याकडे एक मोठी बॅग होती. पोलिसांनी या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज मागवले असून सध्या या परिसरातील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ही माहिती देणाऱ्या टॅक्सी ड्रायव्हरची डीसीपी रॅकचे अधिकारी चौकशी करत आहेत.
Security heightened outside Mukesh Ambani's residence 'Antilia' after Mumbai Police received a call from a taxi driver that two people carrying a bag asked for Ambani's residence. pic.twitter.com/RW5uMtcleK
— ANI (@ANI) November 8, 2021
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत असणाऱ्या मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया घराची सुरक्षितता फेब्रुवारी महिन्यातही धोक्यात आली होती. मुकेश अंबानींच्या घराच्या सुरक्षेला घेऊन मोठा प्रश्न निर्माण झाला होता. २५ फेब्रुवारी रोजी अँटिलियाबाहेर अज्ञात स्कॉर्पियोमध्ये जिलेटीनच्या कांड्या आढळल्या होत्या. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे.