Top Newsमनोरंजनराजकारण

‘आप’च्या जवळ जाताच सोनू सूदच्या मालमत्तांवर आयकर विभागाचे छापे

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या घरी आयकर विभागाची पडताळणी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी आयकर विभागाचे मोठे अधिकारी सोनू सूदच्या घरी उपस्थित आहेत. मुंबईतील सोनू सूदच्या एकूण ६ जागांवर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांची पाहणी सुरू आहे. विशेष म्हणजे दिल्ली सरकारने अलीकडेच सोनू सूदला मेंटरशिप कार्यक्रमाचं ब्रँड ॲम्बेसेडर बनवलं होतं. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

लॉकडाऊन दरम्यान लाखो लोकांना घरी पोहचण्यासाठी सोनू सूदनं मदत केली होती. तेव्हापासून गरिबांसाठी सोनू सूद हा रिअल लाईफ हिरो ठरला होता. पहिल्या लॉकडाऊनपासून आतापर्यंत सोनू सूदने अनेक लोकांची मदत केली आहे. अभिनेता सोनू सूदच्या सोशल मीडियावर जर कोणी मदतीसाठी विनंती केली तर तात्काळ सोनू सूदकडून त्या मेसेजची दखल घेतली जाते. कोरोनाच्या काळात अभिनेता सोनू सूदच्या लोकप्रियतेत प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून आलं.

आम आदमी पार्टीच्या दिल्ली सरकारने चित्रपट अभिनेता सोनू सूदला ‘देश के मेंटर’ कार्यक्रमाचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे; परंतु ही नियुक्ती पंजाबमधील निवडणुका दृष्टिक्षेपात ठेवून करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला होता. सोनू सूदचा जन्म मोगा, पंजाब येथे झाला. त्याने हिंदी, तेलुगू, कन्नड आणि तमिळ भाषेतील चित्रपट तसेच पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे. या व्यतिरिक्त, सूदची कोरोना महामारीदरम्यान त्याच्या मानवतावादी कार्यासाठी संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाद्वारे सन्माननीय २०२० विशेष मानवतावादी कृती पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

माहिती नुसार सोनू सूदकडे एकूण १३० कोटी रुपयांची संपत्ती आहे. सोनू सूद गेल्या २ दशकांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये काम करत आहे. मुंबईतील लोखंडवाला परिसरात २६०० चौरस फुटांच्या ४ बीएचके फ्लॅटमध्ये सोनू सूद राहतो. यासह सोनूचे मुंबईत आणखी दोन फ्लॅट आहेत. सोनू सूद उत्तम अभिनेता असण्यासोबत उत्तम बिझनेसमनही आहे. जुहूमध्ये सोनू सूदचे हॉटेल आहे. याशिवाय अनेक आलिशान आणि महागड्या गाड्यांचं कलेक्शन त्याच्याकडे आहे. बॉलिवूडमध्ये अभिनयासोबतच एक निर्माता म्हणूनही त्याची ओळख आहे. मर्सिडीज बेंझ एमएल क्लास ३५० सीडीआय कार असून किंमत ६६ लाख रुपये आहे. याव्यतिरिक्त ऑडी क्यू ७ या गाडीची किंमत जवळपास ८० लाख रुपये इतकी आहे. पोर्शची पनामा कार ज्याची किंमत २ कोटी आहे. सिनेमाचे मानधन आणि ब्रँड एन्डॉर्समेंट ही त्याच्या मुख्य कमाईचे साधन आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button