कोल्हापूर/पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणीच्या कार्यालयावर आयकर विभागाने गुरुवारी छापा टाकला. पवार यांच्या बहिण विजया पाटील यांची पब्लिशिंग कंपनी आहे. त्या राजकारणाशी संबंधित नाहीत. त्यांची कोणतीही कंपनी नाही. पब्लिशिंग कंपनी असली तरी त्याचीही उलाढाल मर्यादित आहे. विजया पाटील या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोठ्या बहिण आहेत.
पवार यांच्या अनेक निवडणुकीत त्या यंत्रणा राबवण्यात पुढे असतात. एका माध्यम समुहातून सरव्यवस्थापक पदावरून बाजूला झाल्यावर त्या या पब्लिशिंग कंपनीचे काम पाहतात. गुरुवारी सकाळी आयकरच्या सहा अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन कागदपत्रांची तपासणी केली. परंतु त्याबद्धल अधिकृत दुजोरा मिळाला नाही. विजया पाटील यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद होता. सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखाना उपमुख्यमंत्री पवार यांनीच घेतल्याचे तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. त्याची चौकशी करताना आयकर विभागाने त्यांच्या कोल्हापुरातील व पुण्यातील बहिणीच्या घरी छापे टाकले.
सर्व यंत्रणांचा वापर करा; आमचे नेते घाबरणारे नाहीत : नवाब मलिक
ईडी, एनआयए आणि एनसीबीसारख्या सर्व यंत्रणांचा वापर महाराष्ट्रातील सरकार व नेत्यांविरुद्ध कटकारस्थान करण्यासाठी केला जातोय परंतु आमचे नेते घाबरणारे नाही उलट सरकार अजून भक्कम होतंय असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कंपन्यांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या असून यावर नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
ज्या पध्दतीने अजित दादांच्या कंपन्यांवर, त्यांच्या निकटवर्तीयांवर धाडी टाकण्यात येत आहेत त्यावरून स्पष्ट होते आहे की, या राज्यात किंवा जिथे जिथे भाजप विरोधी सरकार निर्माण झाले आहे त्या सरकारला टार्गेट करून बदनाम केले जात आहे. जी परिस्थिती पश्चिम बंगालमध्ये होती तीच परिस्थिती राज्यात निर्माण करण्याचे काम केंद्र सरकारच्या माध्यमातून होत आहे असाही आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
आमच्या नेत्यांची नाहक बदनामी : जयंत पाटील
राज्यात आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र भाजप करत आहे. भाजपचे पुढारी आमच्या नेत्यांची नावं घेतात आणि त्या पाठोपाठ ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्स येते. भाजपनं राष्ट्रवादीचा एवढा धसका का घेतलाय..?, असा प्रश्नही जयंत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केला. आमचा कायद्यावर विश्वास आहे. यापूर्वी छगन भुजबळ यांना असाच त्रास देण्यात आला, यांनाही न्याय मिळाला असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. या देशातल्या सर्व एजन्सी भाजप चालवतंय, सरकार चालवत नाही! इन्कम टॅक्स विभागाला माहिती हवी होती तर त्यांनी कारखान्यांना विचारायला हवं होतं. पण धाड घालायची, पहाटेच घालायची ही सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कधीच कशाचीच कागदपत्रे दडवली नाहीत, ही माहितीही जयंत पाटील यांनी दिली. तसेच लखीमपूर दुर्घटनेला भाजप जबाबदार असल्याचा आरोपही मंत्री पाटील यांनी केला. सध्या देशातील शेतकरी पेटून उठला आहे. लखीमपूरचं हत्याकांड जालियनवाला बाग सारखेच असल्याचे मंत्री पाटील म्हणाले.