आयकरच्या कारवाईचा हिशोब व्याजासकट परत होईल : रुपाली चाकणकर

पुणे: देशातील आणि राज्यातील राजकारणाची पातळी ज्या पद्धतीने खाली घसरली आहे ते धक्कादायक आहे. सरकारी यंत्रणांचा अयोग्य वापर करत एखाद्याचं राजकीय आयुष्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न भाजपला काही नवीन नाही ते त्यांच्या रक्तातच आहे पण या व्यक्तीवरचा राग म्हणून त्याच्या कुटुंबाला, बहिणींना त्रास देण्याची ही कुठली पद्धत, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या घरांवर, ऑफिसमध्ये दोन दिवस आयकर विभागाच्या धाडी पडल्या होत्या. त्याचा निषेध नोंदवित अजित पवार या भाजपच्या कृतीची परतफेड करतील असंही चाकणकर म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या, एखादी व्यक्ती आपल्या यंत्रणेला जुमानत नाही, आपल्या पक्षाला जुमानत नाही तेंव्हा त्याच्या कुटुंबातील महिलांना टार्गेट करून त्या व्यक्तीला हार मानायला लावणार असाल तर लक्षात ठेवा की ते अजित पवार आहेत. अजित पवार कधीच हारणार नाहीत. माणूस स्वतःवर आलेल्या कोणत्याही संकटांशी सामना करेल परंतु यामध्ये विनाकारण घरातील महिलांना मधे ओढून यातून राजकारण करत असेल तर दादा ते व्याजासकट याचा हिशोब चुकता करतील असं चाकणकर म्हणाल्या.