पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात ७९.७९ टक्के मतदान
अनेक ठिकाणी हिंसाचार; भाजप कार्यकर्त्याची हत्या!
कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (West Bengal Assembly Election 2021) पहिल्या टप्प्यातील मतदान शनिवारी झाले. मतदानाला जबरदस्त उत्साह दिसून आला. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान केंद्रांच्या बाहेर मोठ्या संख्येने लोक उभे असून मतदान करण्यासाठी वाट पाहत होते. संध्याकाळी ६.३० वाजता मतदान संपल्यानंतर सरासरी ७९.७९ टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे.
जरी असा जबरदस्त उत्साह दिसत असला तरी दुसऱ्या बाजूला हिंसक प्रकार घडत आहेत. पूर्व मेदिनीपुरमध्ये मतदानाच्या पूर्वी झालेल्या गोळीबारमध्ये दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाल्याचे समोर आले आहे. तर सालबोनीमध्ये सीपीएम उमेदवार सुशांत घोष यांच्यासोबत धक्काबुकी झाली. भाजप नेते सुवेंदु अधिकारी यांच्या भावाच्या गाडीवर हल्ला झाला आणि यांच्यामागे टीएमसी असल्याचा आरोप लावला आहे. शिवाय यादरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. भाजप एका कार्यकर्त्याची हत्या झाल्याचे समोर आले आहे. तसेच सत्ताधारी पक्ष टीएमसीने (TMC – अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेस) निवडणूक आयोगाच्या APPमध्ये गडबड असल्याचा आरोप केला आहे. अशा प्रकारे आज मतदानाच्या पहिल्याच टप्प्यात हिंसक वातावरणाने सुरुवात झाल्याचे दिसत आहे.
पश्चिम बंगालच्या पूर्वी मेदिनीपुरमध्ये मतदान सुरू होण्यापूर्वी हल्ला झाला आहे. येथील भगवानपूर विधानसभा क्षेत्रातील सत्सतमलमध्ये गोळीबार दरम्यान दोन सुरक्षा कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी भाजपने टीएमसीवर आरोप केला आहे. जिल्हाध्यक्ष अनूप चक्रवर्ती म्हणाले की, ‘टीएमसीशी जोडलेले लोकं अरगोल पंचायत भागातील लोकांना धमकावत आहेत.
मतदानाच्या काही वेळापूर्वी पुरुलिया जिल्ह्यामध्ये बंदवानमध्ये मतदानाच्या वेळी वापरण्यात येत असलेल्या गाडीला आग लावली गेली. माहितीनुसार, मतदान केंद्रावर निवडणूक अधिकाऱ्यांना सोडल्यानंतर गाडी परत जात होती. यादरम्यान राज्यातील नक्षलग्रस्त असलेल्या जंगलमहल क्षेत्रातील तुलसिडी गावात गाडीला आग लावली.
पश्चिम मेदिनीपुरच्या सालबोनीमध्ये सीपीएम उमेदावर सुशांत घोष यांच्यावर हल्ला झाला. एक व्यक्तीने सुशांत घोष यांच्यावर हल्ला केला. यावेळी परिस्थिती चिघळली आणि गर्दीत सीपीएम उमेदवाऱ्याच्या गाडीवर दगडफेक केली. याप्रकरणी सुशांत घोष यांनी तृणमूल काँग्रेसवर आरोप केला आहे. याचा व्हिडिओ समोर आला असून याप्रकरणी ३ जणांना अटक करण्यात आली आहे.
सुवेंदु अधिकारी यांच्या भावाच्या गाडीवर हल्ला
भाजप नेते आणि नंदीग्रामचे उमेदवार सुवेंदु अधिकारी यांचे भाऊ सुमेंदु अधिकारी यांनी आपल्या गाडीवर हल्ला झाल्याचा दावा केला. यामागे टीएमसी ब्लॉक प्रेजिडेंट राम गोविंद दास यांचा हात असल्याचा आरोप सुमेंदु अधिकारी यांनी केला आहे.
भाजप कार्यकर्त्याची हत्या
केशियारीमध्ये भाजप कार्यकर्ता मंगल सोरेनचा मृतदेह आढळला आहे. या कार्यकर्त्याला मारहाण करून हत्या केल्याचा दावा भाजपने केला आहे. कार्यकर्त्याच्या घरात घुसून त्याला बेदम मारहाण करून त्याची हत्या केल्याचे भाजपने म्हटले आहे.