
लखनौ – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी भाजपच्या अडचणी चांगल्याच वाढत चालल्या आहेत. त्यातच आता भाजपसोबत आघाडी न झाल्याने भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या जेडीयूने स्वतंत्रपणे आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. आज जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार राजीव रंजन उर्फ ललन सिंह यांनी पत्रकार परिषद घेत जेडीयूच्या उत्तर प्रदेशमधील उमेदवारांची घोषणा केली आहे. यावेळी उत्तर प्रदेश जेडीयूच्या प्रमुखांनी २६ उमेदवारांची यादी जाहीर केली.
ललन सिंह यांनी सांगितले की , केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते आरसीपी सिंह यांनी भाजपा उत्तर प्रदेशमध्ये जेडीयूसोबत मिळून निवडणूक लढवू इच्छिते. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि भाजपाच्या इतर नेत्यांसोबत चर्चा झाली होती. मात्र भाजपाकडून काही सकारात्मक उत्तर आलं नाही. भाजपाध्यक्ष जे.पी नड्डा यांनीही उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक अपना दल आणि संजय निषाद यांच्या पक्षांसोबत मिळून लढण्याची घोषणा केली होती. यामध्ये जेडीयूचे नाव नव्हते.
जर हे आधीच निश्चित झाले असते तर आम्ही उत्तर प्रदेशात १०० जागांवर निवडणूक लढलो असतो. आता आम्हाला ५० ते ६० जागांवरच निवडणूक लढवता येईल. मात्र आमचा पक्ष पूर्ण ताकतीनिशी निवडणूक लढवणार असून, चांगल्या संख्येने उमेदवार जिंकून आणेल. मात्र उत्तर प्रदेशात स्वतंत्र लढण्याचा बिहारमधील भाजपा जेडीयू युतीवर काही परिणाम होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रियंका गांधींनी ज्या महिलेला तिकीट दिले, त्यांचा सपामध्ये प्रवेश
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत दुसरीकडे काँग्रेसलाही मोठा धक्का बसला आहे. बरेली कँटमधील काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया आरोन यांनी समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी सुप्रिया आरोन यांना पार्टीचे सदस्यत्व दिले आहे. सुप्रिया आरोन या माजी महापौर आहेत. सुप्रिया आरोन यांचे पती प्रवीण आरोन हे माजी खासदार आहेत. ते सुद्धा समाजवादी समाजवादी पार्टीमध्ये सामील झाले.
यावेळी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सुप्रिया आरोन यांचे स्वागत केले. म्हणाले की, सुप्रिया आरोन यांचे समाजवादी पार्टीत स्वागत आहे. त्या बाहेरून समाजवादी पार्टीत आलेल्या नाहीत, त्या पूर्वी समाजवादी पार्टीमध्ये होत्या. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी सरकार स्थापन होणार आहे. लोक समाजवादी पार्टीकडे पाहात आहेत.
अखिलेश यादव म्हणाले की, आम्ही उत्तर प्रदेशच्या लोकांसाठी काही निर्णय घेतले आहेत. समाजवादी पार्टीने नवीन वर्षात उत्तर प्रदेशात सरकार आल्यास ३०० युनिट मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला होता. शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत वीज दिली जाणार आहे. मागील सरकारमध्येही आम्ही लॅपटॉपचे वाटप केले होते, प्रत्येक लॅपटॉपची स्वतःची कहानी आहे, ज्याला लॅपटॉप मिळाला त्याला खूप मदत मिळाली, असे अखिलेश यादव यांनी सांगितले.