मुंबई : शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विंटबना केल्याचा निषेध व्यक्त करणे देशद्रोह कसा असू शकतो? केवळ राजकारणासाठी शिवरायांचा वापर करू नका. देशद्रोह खूप स्वस्त झालाय. भाजपशासित राज्यात काहीही केलं तरी देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतो. महाराष्ट्रात या गुन्ह्याबद्दल आवाज उठवणे गरजेचे आहे, असे टीकास्त्र शिवसेना नेते, खा. संजय राऊत यांनी सोडलंय.
काही दिवसांपूर्वी कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. त्या घटनेचे महाराष्ट्रातही मोठे पडसाद उमटले. दरम्यान, त्या घटनेचा निषेध करणाऱ्या बेळगावातील तरुणांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्या प्रकरणावरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
राऊत पुढे म्हणाले की, बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे 38 तरुण तुरुंगात आहेत. त्यांच्यावर देशद्रोह गुन्हा दाखल केलाय. त्यांचा गुन्हा एवढाच की, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अपमानाचा निषेध केला. छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे तुम्हाला माहित नाही का? एका बाजूला काशीमध्ये नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा पुरस्कार करतात आणि त्याच पक्षाच्या राज्यात छत्रपतींचा अपमान होतो, असा टीका राऊतांनी केली.