Top Newsराजकारण

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात १६ जुलैला महत्त्वाची बैठक

व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेणार

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे खबरदारी घेण्यात येत आहे. दुसरी लाट ओसरत असताना बऱ्याच राज्यांनी अनलॉकच्या दिशेने वाटचाल केली आहे. त्यात केंद्र सरकारने राज्यांना सावधानता बाळगण्याचा इशारा दिला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात येत्या १६ जुलै रोजी महत्त्वाची चर्चा होईल. व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे होणाऱ्या या बैठकीत कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. देशातील ६ राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबतच तामिळनाडूचे एम के स्टॅलिन, आंध्र प्रदेशचे वाय. एस जगनमोहन रेड्डी, कर्नाटकचे बी.एस येडियुरप्पा, ओडिशाचे नवीन पटनायक, केरळचे पिनरई विजयन यांच्यासोबतही पंतप्रधान संवाद साधणार आहेत.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी ऑक्सिजन उत्पादन, साठा यांचे नियोजन तसेच उद्योगांतील कामगार- कर्मचारी यांचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण, निर्बंध कडक करावे लागले तरी आर्थिक चक्र सुरू ठेवणे, उत्पादनावर परिणाम होऊ न देणे, कामगारांची कंपनीच्या परिसरातील तात्पुरती फिल्ड निवास व्यवस्था, कामाच्या वेळा, कोविड प्रादुर्भाव होऊ न देणारी व्यवस्था (बायो बबल) यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रशासनाला तयार राहण्याचे निर्देश दिले आहेत.

सुमारे १३०० मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन राज्यात केले जाते. येणाऱ्या काळात कोविडचे आव्हान अधिक वाढले तर ऑक्सिजनची मागणी दुसऱ्या लाटेपेक्षा देखील अधिक भासू शकते. त्यामुळे ऑक्सिजन निर्मितीबरोबरच ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणावर साठा करून ठेवणे, त्यासाठी टँक्स, सिलिंडरची आवश्यकता आहे. उद्योगांनी त्यांच्या कामगार व कर्मचाऱ्यांचे लसीकरण मोठ्या प्रमाणावर करून घ्यावे. आजमितीस केंद्राने दिलेला २५ लाख डोसेसचा साठा खासगी रुग्णालयांकडे आहे. तो मोठ्या प्रमाणावर वापरला गेला पाहिजे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button