
‘मी 24 तास’ च्या बातम्यांमध्ये वृत्तनिवेदीका एक आंतरराष्ट्रीय महत्त्व असलेली स्फोटक बातमी अत्यंत घाईघाईने आणि पूर्वी जुन्या चित्रपटांमध्ये शत्रुघ्न सिन्हा जितक्या जोरात ओरडून ‘खामोश !’ बोलत असे तितक्याच जोरात ओरडून देत असते, ‘ दादर स्टेशन बाहेरील लिंबू सरबतच्या गाडीवर लिंबू सरबतमध्ये कमी साखर टाकून गाडीवाला जनतेची चक्क फसवणूक करीत आहे. ( हेच वाक्य वाचकांनी वेगवेगळ्या पद्धतीने २० ते २५ वेळा वाचावे म्हणजे मग वाहिनीवर बातम्या ऐकल्याचा फील येईल !) ही बातमी ‘मी 24 तास’ वाहिनीवरच सर्वप्रथम दाखविण्यात येत आहे. आमचे प्रतिनिधी सदा भटके प्रत्यक्ष त्या ठिकाणी परिस्थितीचा आढावा घेत आहेत. आपण थेट त्यांच्याशी बोलू या.
‘काय म्हणशील सदा, त्या गाडीवाल्याने तुला पाहिलं आहे का ?’
‘नाही. संपदा. अजून मी त्याच्या नजरेला पडलेलो नाही,पण त्याच्यापासून सुरक्षित अंतरावर थांबून मी सरबत पिऊन आलेल्या ग्राहकांशी बोललो आहे.’ सदा पाच सहा किलोमीटर धावून आल्यावर निघेल अशा आवाजात माहिती देतो.
‘ सदा, काय प्रतिक्रिया आहे लोकांची ?’
‘ संपदा, सरबतमध्ये साखरेचं प्रमाण कमी असल्यामुळे लोक खूपच संतप्त झालेले आहेत. आपली इम्युनिटी वाढविण्यासाठी लोक लिंबू सरबत पितात आणि सरबतमध्ये कमी साखर टाकून त्यांची फसवणूक होत असतांना प्रशासन मात्र झोपलेलं आहे.’
‘ सदा, खरोखरच हा फार गंभीर प्रकार आहे आणि सर्वप्रथम आपणच याला वाचा फोडली आहे.आम्ही वेळोवेळी तुझ्याकडून याबाबतचे अपडेट्स घेतच राहणार आहोत. तू परिस्थितीवर नजर ठेव. तूर्तास तू दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.’
‘मी 24 तास’वरची बातमी ऐकल्यावर दुसऱ्या दिवशी संबंधित अधिकारी दादरच्या लिंबू सरबतच्या त्या गाडीवर पोहचतात. आपले ओळखपत्र दाखवून मग पेलाभर लिंबू सरबत पिऊन त्यात साखर कमी असल्याची खात्री करून घेतात. तो करत असलेला गुन्हा आणि त्याचे परिणाम समजावून देण्यासाठी त्याला पंटरसोबत बाजूला पाठविण्यात येते. त्याचा ‘अर्थ’ गाडीवाल्याच्या डोक्यात आणि पंटरच्या खिशात उतरल्यानंतर गाडीवाल्याला कडक शब्दांत समज देऊन सरबतमध्ये साखरेचं प्रमाण वाढविण्यास लावण्यात येते.परत दोनदा लिंबू सरबत पिऊन ते योग्य प्रमाणात गोड झाल्याची खात्री करूनच त्या सरबताचे दोन नमुने तपासणीसाठी घेण्यात येतात; नंतर गोड झालेल्या तोंडाने आणि जड झालेल्या खिशाने मंडळी कार्यालायस्थ होते.
‘ मी 24 तास’च्या वृत्ताचा दणका ! दादर स्टेशन बाहेरच्या लिंबू सरबतच्या गाडीवर अन्न व औषध प्रशासनाची धाड ! तपासणीसाठी नमुने ताब्यात घेतले ! ( वाचकांनी हेच वाक्य 20 ते 25 वेळा वेगवेगळ्या पद्धतीने वाचावे आणि वाहिनीवर बातमी ऐकल्याचा फील घ्यावा.) काल सर्वप्रथम ‘मी 24 तास’ने दादर स्टेशन बाहेरील लिंबू सरबतवाला लिंबू सरबतमध्ये साखर कमी प्रमाणात टाकत असल्याचा भांडाफोड केल्यानंतर आज अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी त्या गाडीवर धाड टाकून तपासणीसाठी नमुने ताब्यात घेतले आहेत. आमचे प्रतिनिधी सदा भटके थेट त्या सरबतच्या गाडी जवळूनच रिपोर्टिंग करीत आहेत. आपण थेट त्यांच्याकडून माहिती घेऊयात.’
‘सदा, काय परिस्थिती आहे तिथली. आज सकाळच्या प्रशासनाच्या कारवाईनंतर काही फरक जाणवतो आहे का ?’
‘संपदा, कालच्या आपल्या दणक्यानंतर आज प्रशासनाने त्या गाडीवाल्यावर जी कारवाई केली त्यामुळे तो चांगलाच वठणीवर आला आहे आणि आता लोकांना गोड सरबत मिळू लागल्यामुळे लोक ‘ मी 24 तास’ला धन्यवाद देत आहेत.संपदा.’
‘ सदा, तू स्वतः सरबत पिऊन ते गोड असल्याची खात्री करून घेतली आहेस का?’
‘हो संपदा, मी स्वतः तशी खात्री करून घेतली आहे.’
‘ सदा, असं गोड सरबत देण्यासाठी तो गाडीवाला आता लोकांकडून जास्तीचे पैसे तर घेत नाही ?’
‘ नाही संपदा, अगदी पहिल्याच दराने तो लोकांना सरबत देतोय आणि याचं श्रेय नक्कीच ‘मी 24 तास’ने दिलेल्या दणक्याला आहे.’
‘ अगदी बरोबर आहे सदा.’मी 24 तास’ नेहमीच लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असते आणि प्रश्न सोडविला जात नाही तोपर्यंत त्याचा पाठपुरावा करीत असते. आम्ही दिलेल्या दणक्याने प्रशासन कामाला लागते असा आमचा नेहमीचाच अनुभव आहे.’