निवडणूक असणाऱ्या राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांवर तत्काळ निर्बंध घाला!
मनसे नेते बाळा नांदगावकर यांची मागणी
मुंबई : निवडणुका असणाऱ्या राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांवर तत्काळ कडक निर्बंध घालण्यात यावे अशी मागणी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे.
बंगाल, तामिळनाडू, केरळ, असाम, पुडुचेरी या राज्यांत निवडणुकांसाठी सगळे नियम झुगारल्याने तेथे मोठ्या गर्दीने सभा घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे तेथील नागरिक हे कोरोनाचे सुपर स्प्रेडर ठरु शकतात. राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यानुसार राज्यातील दुकाने, हॉटेल, मॉल बंद ठेवण्यात आले आहेत. परराज्यातून येणाऱ्या नागरिकांवर कडक निर्बंध लागू करण्यात आले असून त्यांची प्रत्येक स्थानकावर कोरोना चाचणी करण्यात येत आहे. परंतु निवडणूक असणाऱ्या राज्यातून येणाऱ्या नागरिकांवर तत्काळ कडक निर्बंध घालण्यात यावेत अशी मागणी नांदगावकर यांनी केली आहे. आता या राज्यात कोरोनाचे संकट दिसत नाही आहे. परंतु निवडणूका झाल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. येथील नागरिक मुंबईत परतल्यानंतर पुन्हा मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग पसरु लागेल. त्यामुळे या राज्यांतून येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करा आणि कडक निर्बंध घाला अशी मागणी नांदगावकर यांनी केली आहे.