पुणे: कोर्ट कचेऱ्यांवर माझा विश्वास नाही. मराठा समाजाला आरक्षण द्यायची राज्यकर्त्यांची इच्छाशक्तीच नाही. आजचे राजकारणी व्यक्तीकेंद्रीत झाले आहेत. त्यामुळे उद्या समाजाचा उद्रेक झाला तर त्याला जबाबदार कोण?, असा सवाल भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज उपस्थित केला. दरम्यान, आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावून श्वेतपत्रिका काढली पाहिजे. तेव्हा कोणी कोणाला फूस लावली हे लोकांना स्पष्टपणे समजेल. आधी राज्याने मराठा आरक्षणासाठी अधिवेशन बोलवावे आणि कायदा करावा. त्यानंतर केंद्रात काय करायचं ते मी बघतो. संभाजीराजे यावर थेटपणे बोलणार नाहीत. ते जंटलमन आहेत. पण मराठा आरक्षणासाठी कुणाला कुठं गाठायचं हे मी बघतो, असा गर्भित इशाराही उदयनराजे भोसले यांनी यावेळी दिला.
खासदार संभाजी छत्रपती यांनी आज पुण्यात खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षणावर या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे २५ मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर दोघांनीही प्रसार माध्यमांशी संवाद साधला. सुरुवातीलाच उदयनराजे यांनी संभाजीराजेंच्या आंदोलनाला आणि त्यांच्या मागण्यांना पूर्ण पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं. मला सर्वांना सांगावसं वाटतं, आम्ही दोघं एकाच घराण्याचे आहोत. संभाजीराजे वंशज राजाराम महाराजांचे, वडील एकच… त्यामुळे दोन घराण्यांचा विषय नाही, आम्ही एकच आहोत. संभाजीराजेंनी टेक्निकल मुद्दे मांडले. प्रत्येकाने ठरवायचं आहे, देशाची पुन्हा फाळणी करायची आहे का? देशाची फाळणी करण्याच्या दृष्टीने आजचे राज्यकर्ते प्रयत्नशील आहेत असा माझा आरोप नाही तर ठाम मत आहे. हे राज्याच्या बाबतीत आणि केंद्राबाबतीतही लागू आहे, असं उदयनराजे म्हणाले.
२३ मार्च १९९४ ला जीआर काढून आरक्षण देता, ते रद्द करु नका. मग जीआर काढून मराठ्यांनाही आरक्षण द्या. आम्ही जातपात पाहिली नाही. पण आज जाणवत आहे, बोलताना मित्र अंतर ठेवत आहेत. ही दुफळी राज्यकर्त्यांनी निर्माण केली. समाजाचा याच्याशी काही संबंध नाही. राज्यकर्त्यांची इच्छा असेल, तर समाजाशाठी एकत्र यावं. संभाजीराजे किंवा मी दुफळी निर्माण केली नाही. द्यायचं असतं तर मागेच दिलं असतं, यांची इच्छाशक्तीच नाही. त्यामुळे मराठा आरक्षण मिळत नाही. राजकारणी व्यक्तीकेंद्रीत झालेत. उद्या जर तरुणांचा उद्रेक झाला तर त्याला जबाबदार ते असतील. त्यावेळी ना उदयनराजे, ना संभाजीराजे हा उद्रेक थांबवू शकणार नाहीत. आम्ही दोघे आडवे पडलो तरी आमच्यावर घणाघात होईल, आम्हाला बाजूला केलं जाईल..अशी वेळ येऊ देऊ नका, पण ती येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
समाजात तेढ निर्माण करू नका
मंडल आयोगाने ओबोसींना आरक्षण दिले. त्यावेळी दिल्लीतच होतो. तेव्हा दिल्लीत आरक्षण विरोधक आणि समर्थकांची रस्त्यावरच भोसकाभोसकी सुरु होती. मी दिल्लीत होतो ते मला आठवतंय… तुम्ही इशू बेस पॉलिटिक्स करा. समाजात तेढ निर्माण करू नका. कोर्ट कचेऱ्यावर मला अजिबात आता विश्वास नाही, काय घडणार हे मला माहिती आहे, असं ते म्हणाले.
आडवा आणि गाडा, जाब विचारा
संभाजीराजेंना माझा पाठिंबा आहे. मराठ्यांना आरक्षण हे एकच ध्येय आहे. राज्यकर्त्यांना फार मुभा दिली. निवडून आलं म्हणजे आपलं सगळं असं समजू नका. लोकशाहीचे हे राजे आहेत, त्यांना जाब विचारला पाहिजे. माझं ठाम मत आहे, आडवा आणि गाडा, जाब विचारा.. सुरुवात माझ्यापासून करा. आमच्या वाड्यावर येऊन विचारा… माझ्याप्रमाणे सर्वांना विचारा.. खरं खोटं करा.. किती काळ संभ्रमावस्थेत ठेवणार, असा सवालही त्यांनी केला.
उच्च-निच्च ठरवण्याचा अधिकार यांना कुणी दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली. त्याला 70 वर्षे झाली. त्यावेळची परिस्थिती आणि आताची परिस्थितीत काही फरक आहे की नाही? मग त्यात अमेंडमेंट्स दुरुस्ती केल्या पाहिजेत. लोकांना एकत्र ठेवण्यासाठी ते आवश्यक आहे. अन्यथा देशाचे तुकडे होतील. लोकशाहीतील राजांना हे कळत नसेल तर दुर्दैव. मतदारांनी त्यांना जाब विचारायला हवा, असं ते म्हणाले.
पाच बोटं एकसारखे नसतात. सर्वांचे विचार वेगवेगळे असतात. माझे प्रिन्सिपल वेगळे आहेत, तुमचे वेगळे आहेत. मी कायदे बियदे मानत नाहीत. सुप्रीम कोर्टात कुणी गायकवाड आयोगाचा अहवाल वाचलाच नाही, हे माझं ठाम मत आहे. गरिबांना वंचितांना शिक्षणापासून का दूर ठेवताय?, असा सवालही त्यांनी केला.
पक्ष-बिक्ष इथे आणू नका. मी जे बोलतोय ते सगळ्या पक्षांना लागू आहे. हा प्रश्न समाजाचा आहे. सामाजिक व्यवस्थेत फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. राज्याने कायदा करावा. विशेष अधिवेशन बोलवा आणि कायदा करा. उद्धव ठाकरे, अजित पवार सोडा… सभागृहात एक आणि बाहेर एक असं बोलू नका. विशेष अधिवेशन बोलवा, श्वेतपत्रिका काढा. कुणी कोणाला फूस लावली ते लोकांना कळेल. बाकीच्यांना आरक्षण मिळालं, तसं मराठ्यांना मिळायला हवं. लोकसंख्येच्या हिशेबाने देणार असेल तर कॅल्क्युलेशन करा, असं ते म्हणाले.
केंद्राचं मी बघतो !
मराठा आरक्षणासाठी आधी राज्यानं ठोस काही करावं, केंद्राचं बघतो मी, असं सांगतानाच संभाजीराजे बोलणार नाहीत. ते जंटलमेन आहेत. मी बोलतो. कुणाला कुठं गाठायचं, काय करायचं हे मी बघतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही : संभाजीराजे
दोन्ही छत्रपती घराण्यांचा फार मोठा सामाजिक वारसा आहे. समाजाला आम्ही नेहमी एक वेगळी दिशा दिली आहे. दिशाभालू करणं आमच्या रक्तात नाही. म्हणून आपण उदयनराजेंची भेटी घेतली. आमची सविस्तर चर्चा झाली असून बहुतांश अनेक विषयांवर आमचं एकमत आहे. आमच्यात अजिबात दुमत नाही. आम्ही पूर्वीपासून एकमतानं काम करत आलो आहोत, असं संभाजीराजेंनी यावेळी सांगितलं.
मी पाच मागण्या मांडल्या असून मंजूर केल्यास स्वागत करु शकतो. समाज बोलला आहे, लोक बोललेत आणि लोकप्रतिनिधींनी बोलणं गरजेचं आहे. अधिवेशनाच्या माध्यमातूनही हा प्रश्न मार्गी लागू शकतो, असंही यावेळी त्यांनी सांगितलं. बऱ्याच वर्षानंतर सातारा आणि कोल्हापूर घराणं एकत्र झाल्याचा आनंद यावेळी त्यांनी व्यक्त केला. अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराज भेटीवर बोलताना ते म्हणाले की, अजित पवार यांना आशीर्वाद घ्यायचा असेल. त्या भेटीत काय झालं याची माहिती नाही. ही भेट होणार आहे याची मला कल्पना नव्हती. काही सकारात्मक होत असेल तर स्वागतच आहे.
म्हणून मोदींनी भेट टाळली असेल: संभाजीराजे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत मी जेव्हा जेव्हा इच्छा व्यक्त केली तेव्हा एक ते दीड दिवसांमध्ये मला भेट दिली. फक्त मराठा आरक्षणाबाबत तांत्रिक बाबींमुळे कदाचित त्यांची अडचण झाली असेल. त्यामुळे त्यांनी यावेळी भेट टाळली असावी, असे संभाजीराजे यांनी सांगितले.