Top Newsराजकारण

शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास हे सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही !

मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा इशारा

नवी दिल्ली: जर शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर हे सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही, असा इशारा मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मोदी सरकारला दिला आहे. राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील एका कार्यक्रमाच्या वेळी स्थानिक पत्रकारांशी बोलताना सत्यपाल मलिक म्हणाले की, आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची विनंती सरकारला केली आहे.

मलिक पुढे म्हणाले की, भाजप नेते आता उत्तर प्रदेशातील अनेक गावांमध्ये प्रवेश करू शकत नाहीत. मी मेरठचा आहे, कोणताही भाजप नेता माझ्या भागातील कोणत्याही गावात प्रवेश करू शकत नाही. मेरठमध्ये, मुझफ्फरनगरमध्ये, बागपतमध्ये ते प्रवेश करू शकत नाहीत. जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की, शेतकऱ्यांसोबत उभे राहण्यासाठी आपले पद सोडतील का? त्यावर मलिक म्हणाले, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे आणि सध्या पद सोडण्याची गरज नाही. पण गरज असेल तेव्हा तसेही करेल.

मलिक म्हणाले, शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावर मी अनेक लोकांशी लढा दिला आहे. पंतप्रधान, गृहमंत्री, प्रत्येकासाठी त्यांच्याशी भांडलो आहे. मी सर्वांना सांगितले आहे की तुम्ही चुकीचे करत आहात, ते करू नका. शेतकरी तीन कायद्यांचा मुद्दा वगळू शकतात कारण सर्वोच्च न्यायालयाने त्यावर स्थगिती आणली आहे. तुम्ही फक्त एमएसपीची गॅरेंटी द्या, पण तुम्ही तसं करत नाही आहात.

ते पुढे म्हणाले की, पंतप्रधानांना सार्वजनिकरित्या कोणताही संदेश देणार नाही, परंतु वैयक्तिकरित्या त्यांचे मत मांडेल. तुम्ही एमएसपीची हमी द्या, मी शेतकऱ्यांना तीन कायद्यांबद्दल समजावून सांगेन. त्यांना किमान आधारभूत किमतीची हमी मिळाली पाहिजे, त्यापेक्षा कमी ते तडजोड करणार नाहीत.

यावेळी सत्यपाल मलिक यांनी जम्मू-काश्मीरमध्ये अलीकडच्या काळात स्थानिक नागरिकांच्या झालेल्या हत्यंवर भाष्य केलं. ते म्हणाले, मी राज्यपाल होते तेव्हा दहशतवाद्यांनी श्रीनगरच्या ५० किमी आत प्रवेश करण्याची हिंमत केली नाही. तेव्हा काहीही होत नव्हतं, ना दगडफेक होत होती, ना दहशतवादी भरती होत होती. पण, आता ते उघडपणे शहरातील लोकांना मारत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button