
पुणे : विरोधकांकडून विशेषतः भाजप नेत्यांकडून सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये आपल्याला रस नसल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं. पुरावे देऊन हे आरोप सिद्ध झाले तर त्याबद्दलची कारवाई होईल. पण हल्ली मी बघतो की खूप काही आरोप केले जातात. ते कुठल्या स्तरावर जातायत, कशी माफी मागितली जाते, दिलगिरी व्यक्त केली जाते हे तुम्ही पाहाता. मी नेहमी सांगतो की मला या कुठल्याही गोष्टीमध्ये रस नाही. मला कामात रस आहे. आम्ही आपल्यावर जी जबाबदारी सोपवली आहे, ती पार पाडण्याचं काम करतोय, असं अजित पवार यावेळी म्हणाले.
पुण्यात करोनासंदर्भातल्या आढावा बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार यांनी माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरं दिली. यावेळी किरीट सोमय्यांनी संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांवर केलेल्या आरोपांसंदर्भात विचारणा केली असता अजित पवारांनी त्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. महत्त्वाच्या प्रश्नांना अग्रक्रम देऊन ते सोडवण्याचा प्रयत्न सर्वांनी करायला हवा. राज्यकर्त्यांनी त्याविषयी योग्य ते निर्णय घेतले पाहिजेत. विरोधकांनीही कुठल्याही गोष्टीला नको तितकं महत्त्व देऊन त्याची चर्चा करू नये, असं अजित पवार यावेळी म्हणाले.
दरम्यान, किरीट सोमय्यांनी पुण्यातील जम्बो कोविड सेंटरबाबत केलेल्या आरोपांविषयी अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कोविड सेंटर्सच्या व्यवस्थेमध्ये सुरुवातीपासून पारदर्शकता ठेवली आहे. कुठेही चूक होणार नाही अशा सूचना दिल्या आहेत. जर कुणाचं तसं म्हणणं असेल त्यांच्याविरुद्ध पुरावे द्या, त्यावर चौकशी करून दोषींवर कारवाई करू, असं ते म्हणाले.
पुण्यातील शाळा पूर्ण वेळ भरणार
पुण्यातील शाळा १ फेब्रुवारीपासून सुरू केल्या. पहिली ते आठवीचे वर्ग अर्ध वेळ भरवण्यात येत होत्या. पण आता पहिली ते आठवीचे वर्ग पण पूर्णवेळ भरवण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. त्यामुळे आता पुण्यातील पहिली ते आठवीचे वर्ग पूर्ण वेळ भरवण्यात येणार आहेत.
पुणे जिल्ह्यात लसीकरण चांगले सुरू आहे. पहिला डोस अनेकांचा झाला आहे. दुसरा डोस पुणे जिल्ह्यात ८६86 टक्के इतका झाला आहे. पण १५ ते १८ वयोगटात पुणे-पिंपरी चिंचवड शहरात कमी लसीकरण झालं आहे. ग्रामीण भागात चांगले लसीकरण झाले आहे. १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लसीचा तुटवडा जानवतोय. सोमवारी लसींचा साठा उपलब्ध होईल. मी सुद्धा मुंबईत गेल्यावर संबंधितांसोबत बोलतो. कुठेही लसींचा तुटवडा होता कामा नये. जम्बो हॉस्पिटलचा निर्णय १८ फेब्रुवारीनंतर घेण्यात येईल.
टीईटी घोटाळा चौकशीत पोलिसांवर दबाव नाही
टीईटी घोटाळा चौकशी प्रकरणी पोलिसांवर कोणताही दबाव नाही, मुख्य सचिव तपासाची माहिती घेऊ शकतात. त्यांना तो अधिकार आहे, पण या टीईटी घोटाळा चौकशीत सरकारच्या बाजुने कोणताही हस्तक्षेप केला जाणार नाही अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे.