
मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांच्यावर टीकास्त्र सोडतं मोठा बॉम्ब फोडला आहे. नवाब मलिक यानी दाऊदच्या निकटवर्तीयांकडून जमीन विकत घेतल्याचा आरोप भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केलाय. मुंबईतील एलबीएस रोड या मोक्याच्या ठिकाणी नवाब मलिक यांच्या कुटुंबाच्या कंपनीनं गुन्हेगाराकडून ३ एकर जमीन फक्त ३० लाख रुपयांत खरेदी केल्याचा आरोप फडणवीस यांनी केलाय. शाह वली खान आणि सलीम पटेल या दाऊद यांच्या दोन निकटवर्तींयाकडून नवाब मलिक यांनी जागा विकत घेतली. या दोघांनर १९९३ बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आहेत. या बॉम्बस्फोटातील आरोपींकडून मलिकांनी फक्त तीस लाख रुपयांत जागा विकत घेतली. याचे पुरावा शरद पवार यांच्याकडे पाठवणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितलं. आपले मंत्री काय करतात हे पवारांनाही कळू द्या, असेही म्हटलेय.
मुंबईला घायाळ करणाऱ्या गुन्हेगाराकडून जमीन विकत कशी घेतली? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केल. फक्त ही एकच नाही. अन्य चार मालमंत्तामध्ये अंडरवर्ल्डचा सहभाग आहे. मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबध आहेत. त्यामुळेच प्राईम लोकेशनची जमीन मलिकांना स्वस्तात मिळाली. ही जमीन विकत घेताना स्टॅम्प ड्युटींमध्येही घोटाळे झाल्याचा आरोप फडणवीस यांनी यावेळी केला.
LIVE | Media interaction in #Mumbai https://t.co/VvpeZTlHNw
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 9, 2021
फडणवीस म्हणाले की, काही दिवसांपूर्वी मी एक घोषणा केली होती. काही गोष्टी दिवाळीनंतर मी तुम्हा सर्वांसमोर मांडेल. पण काहीसा उशीर झाला. कागदही गोळा होत होते. काही लोकांच्या पत्रकार परिषदांचे दिवस आधीच बुक होते. म्हणून मला थोडासा वेळ लागला. मी जे सांगणार आहे तो अत्यंत गंभीर आणि राष्ट्राच्या सुरक्षेशी निगडीत मुद्दा आहे. सर्वात आधी मी दोन पात्रांबाबत मी तुम्हाला सांगणार आहे. त्यातील एक म्हणजे, सरदार शहाब अली खान. हे १९९३ बॉम्ब ब्लास्टमधील गुन्हेगार आहे. यांना आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे आणि सध्या ते तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. यांच्यावर आरोप होता की, टायगर मेमनच्या नेतृत्त्वात हा फायर ट्रेनिंगमध्ये सहभागी झाला होता. बॉम्बे स्टॉक एक्चेंज आणि मुंबई महापालिकेत बॉम्ब कुठे ठेवायचा? या दोन्ही ठिकाणी बॉम्ब कुठे ठेवायचा याची रेकी केली होती. तसेच टायगर मेमनच्या घरी बॉम्ब स्फोटाचं जे कारस्थान झालं होतं, त्या सर्व बैठकांना हे उपस्थित होते. तसेच टायगर मेमनच्या घरातील गाड्यांमध्ये आरडीएक्स भरण्यात आलं, त्यामध्येही हे सहभागी होते.
या प्रकरणातील दुसरं पात्र म्हणजे, मोहम्मद सलीम पटेल हा दाऊदचा माणूस आहे. काही वर्षांपूर्वी ज्यावेळी आर. आर. पाटील एका इफ्तार पार्टीसाठी गेले होते. त्यानंतर एका दाऊदच्या माणसासोबत त्यांचा फोटो आला होता. तो माणूस म्हणजे, सलीम पटेल., हे सांगताना आर. आर. पाटलांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नव्हता, फोटोमुळे त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते, असंही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, मोहम्मद सलीम पटेल हा दाऊदचा माणूस. दाऊची बहिण हसीना पारकरचे ते चालक होते.
कुल्यामध्ये एलबीएस रोडवर जवळपास ३ एकर जागा आहे. एलबीएस रोडवर अगदी महागडी जागा होती. सरदार शाहवली खान आणि सलीम पटेल यांनी मलिक कुटंबाच्या कंपनीला जमीन विकली. या कंपनीच्या वतीनं जागेच्या कागदपत्रांवर फराज मलिक यांनी सही केली आहे. आजही ही कंपनी नवाब मलिक यांच्या कुटुंबियांची आहे. काही काळ स्वतः नवाब मलिकही या कंपनीचे डायरेक्टर होते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, सरदार शाहवली खान आणि सलीम पटेल यांनी सॉलिडस कंपनीला ही जागा केवळ ३० लाख रुपयांना विकली आहे. कुर्ल्यातील जवळपास ३ एकर जमीन ३० लाखांना विकली. तर याचं पेमेंट केलंय २० लाखांचं. आजही त्या ठिकाणी एक मोठं शेड सॉलिडस कंपनीनं भाड्यानं दिलेलं आहे., असं ते म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, मला मिळालेल्या माहितीनुसार, आजही एक कोटी महिना या जागेचं भाडं सॉलिडसला मिळतंय , असंही फडणवीस म्हणाले.
कुर्ल्यातील त्या जागेच्या मागेच पाईपलाईनच्या कच्च्या रोडवर आणखी एक जागा २००५ मध्ये मिलकांच्या कुटुंबियांनी आणखी एक प्रॉपर्टी विकत घेतली होती. तसेच याच भागातील फिनिक्स मार्केट सिटी कुर्ला याची जमीन २००५ सालीच विकण्यात आली. ती २०५० रुपये चौरस फुटानं विकण्यात आली. सॉलिडसनं या दोन अंडरवर्ल्डच्या लोकांनी ही २५ रुपये चौरस फुटानं जमीन विकत घेतली. आता मुंबईत उकीरड्याचीही जागाही इतक्या कमी किमतीत मिळत नाही. आता प्रश्न हा आहे, मुंबईच्या हत्यारांकडून ही जमीन विकत का घेतली?, असा प्रश्न फडणवीसांनी मलिकांना विचारला आहे.
व्यवहार झाला, तेव्हा नवाब मलिक मंत्री होते
जागेचा व्यवहार २००३ मध्ये झाला, तेव्हा नवाब मलिक मंत्री होते. अंतिम रजिस्ट्री झाली त्याच्या काही दिवस आधी नवाब मलिक यांना पद सोडावं लागलं. पण तुम्हाला माहिती नव्हतं का सलीम पटेल कोण आहे? मुंबईच्या गुन्हेगारांकडून तुम्ही जमीन खरेदी का केली? मुंबईत बॉम्बब्लास्ट करणाऱ्यांकडून तुम्ही जमीन का खरेदी केली? अशा कोणत्या कारणामुळे त्यांनी एलबीएसमधली ३ एकरची जमीन इतक्या स्वस्तात दिली. या आरोपींवर टाडा लागला होता. टाडाच्या कायद्यानुसार आरोपीची सगळी मालमत्ता सरकार जप्त करते. मग टाडाच्या आरोपीची जमीन जप्त होऊ नये, यासाठी तुम्हाला ट्रान्सफर केली गेली का?
मलिकांचे अंडरवर्ल्डशी व्यवहार तर तुम्ही गृहमंत्री असताना कारवाई का नाही?, फडणवीसांनी ५ शब्दात विषय संपवला
उपस्थित पत्रकाराने फडणवीसांना अडचणीत आणणारा प्रश्न विचारला. २०१४ ला आपण गृहमंत्री होतात, मग आपणाला हा व्यवहार माहिती असूनही आपण त्यावेळी कारवाई का केली नाही? असा सवाल एका पत्रकाराने विचारला. पत्रकाराच्या प्रश्नाचं फडणवीसांनी ५ शब्दात उत्तर देऊन विषय संपविला. ‘त्यावेळी माहिती नव्हती, आता मिळालीय’, एवढ्या 5 शब्दात त्यांनी पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर दिलं.
शरद पवारांना पुरावे देणार
शरद पवार यांचे अंडरवर्ल्डसोबत संबध आहेत.त्याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. दाऊदच्या निकटवर्तीयांकडून मलिकांच्या कंपनीनं जमीन विकत घेतली. कोट्यवधी रुपयांची जमीन मलिकांनी स्वस्तात विकत घेतली. तसेच स्टॅम्प ड्युटीमध्येही घोटाळा कऱण्यात आलाय. या सर्वांचे पुरावे माझ्याकडे आहेत. हे सर्व पुरावे शरद पवार आणि तपास यंत्रणांना देणार आहे. शरद पवार यांनाही समजू द्या, त्यांचे मंत्री काय करतात? असा हल्लाबोल फडणवीस यंनी केला.
दरम्यान, मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाला नवं वळण मिळालं असून याप्रकरणी आरोप-प्रत्यारोपांचं सत्र रंगल्याचं पाहायला मिळत आहे. या प्रकरणामुळं राजकीय वर्तुळातही चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच राजकीय नेत्यांमध्येही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. या प्रकरणाच्या सुरुवातीपासूनच नवाब मलिकांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंवर एकापाठोपाठ एक आरोप करत नवनवे दावे केले. हे सत्र थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपर्यंत पोहोचलं होतं. अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी राज्यातील ड्रग्ज प्रकरणाचे मास्टरमाईंड देवेंद्र फडणवीस असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. याला प्रत्युत्तर देताना सर्व आरोपांचं खंडन केलं होतं. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिकांवर टीकेची तोफ डागली. आता नवाब मलिक फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पत्रकार परिषद संपताच दुसऱ्या मिनिटाला नवाब मलिकांचं ट्विट, ‘आ रहा हूँ मैं…!’
फडणवीसांची पत्रकार परिषद संपते ना संपते तोच मलिकांनी दुसऱ्या मिनिटाला ट्विट करुन ‘आ रहाँ हूँ मैं’, असं म्हणत प्रत्युत्तर देण्यास तयार असल्याचं एकप्रकारे सांगितलं.