Top Newsराजकारण

हायकोर्टाचा दणका; अनिल देशमुखांची पुन्हा ईडी कोठडीत रवानगी

मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना नऊ दिवस ईडी कोठडी सुनावण्यास नकार देत सुट्टीकालीन विशेष न्यायालयाने शनिवारी त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने विशेष न्यायालयाचा आदेश रद्द करत अनिल देशमुखांना झटका दिला आहे. तसेच, देशमुख यांना १२ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे, आता देशमुख यांना हे पुन्हा ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.

देशमुख हे १ नोव्हेंबर रोजी ईडीपुढे चौकशीला हजर राहिले. त्यांची १२ तास चौकशी करण्यात आली आणि १ नोव्हेंबरच्या मध्यरात्री त्यांना अटक करण्यात आली. माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर सीबीआयने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देशमुख यांच्यावर मनी लॉंड्रिंग अंतर्गत गुन्हा दाखल केला.

देशमुख यांना आणखी नऊ दिवस ईडी कोठडी द्यावी. कारण सुट्टीमुळे ईडीला काही कागदपत्रे मिळण्यास अडचण येत आहे. तसेच अन्य आरोपी व देशमुख यांना समोरासमोर करून चौकशी करायची आहे, असे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी न्यायालयाला सांगितले होते. मात्र, न्यायालयाने देशमुख यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आता, मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय रद्दबातल करत, देशमुख यांना १२ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे.

हृषिकेश देशमुखांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

देशमुख यांचा मुलगा हृषिकेश यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला. त्यावर १२ नोव्हेंबर रोजी सुनावणी आहे. हृषिकेश यांनी शुक्रवारी ईडीपुढे चौकशीस हजर राहणे टाळले. अनिल देशमुख यांना संशयित म्हणण्यात आले आणि १२ तास चौकशी केल्यानंतर आरोपी म्हणून अटक करण्यात आले. तसेच आपल्याबाबत होईल, अशी भीती जामीन अर्जात व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button