मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या ईडीच्या अटकेविरोधातील याचिकेवर बुधवारी तातडीची सुनावणी पार पडणार आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीनं नोंदवलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका नवाब मलिकांनी हायकोर्टात केली होती. अटक बेकायदेशीर असून ताबडतोब सोडण्यात यावे, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली. परंतु नवाब मलिकांच्या ईडीच्या अटकेविरोधातील याचिकेवर बुधवारी सुनावणी पार पडणार आहे. तसेच ही सुनावणी मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती एस. शुक्रे आणि न्यायमूर्ती सानप यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ईडीने अंडरवर्ल्डशी संबंध आणि मनी लॉंड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. यानंतर ईडीने नवाब मलिकांचे भाऊ कप्तान मलिक यांना ईडीने चौकशीसाठी समन्स पाठवले होते. यानंतर आता नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिकला ईडीने चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टानं नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत दिलेल्या ईडी कोठडीला आव्हान दिलं गेले आहे. मलिकांतर्फे याचिकेत राजकीय हेतूसाठी केंद्रीय तपासयंत्रणांचा गैरवापर केला आहे, असा आरोप करण्यात आला आहे.
कुख्यात गुंड दाऊदशी संबंध आणि मनी लॉंड्रिंगप्रकरणात नवाब मलिक यांना ईडीने अटक केले आहे. मालमत्ता खरेदी आणि गैरव्यवहार प्रकरणात नवाब मलिकांना संबंध असल्याचा आरोप ईडीने केला आहे. यामध्ये आता नवाब मलिकांच्या कुटुंबातील सदस्यांना ईडीने समन्स पाठवण्यास सुरुवात केली आहे. नवाब मलिकांच्या अटकेच्या दुसऱ्याच दिवशी त्यांचे भाऊ कप्तान मलिक यांना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिकला ईडीने चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. ईडीने समन्स बजावल्यानंतर फराज मलिकच्या वकिलाने तपास यंत्रणेकडे संबंधित कागदपत्रे सादर करण्यासाठी एका आठवड्याचा अवधी देण्याची विनंती केली. मात्र, ईडीने ही विनंती फेटाळली आहे.