अर्थ-उद्योग

यंदा कोकणातील हापूस निर्यातीत वाढ

हॉलंड, युकेला प्रथमच निर्यात होणाऱ्या 'मायको'च्या ८०० डझन आंब्यांच्या पेट्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते प्रारंभ

मुंबई : शेतातील हापूस ग्राहकापर्यंत पोहचवण्यासाठी व्यापारी, बाजारपेठ यांच्यावर अवलंबून असणारा कोकणातील शेतकरी आता स्वावलंबी बनला आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे बाजारपेठ बंद झाली असतानाही शेतकर्‍यांनी न थांबता हापूसची थेट विक्री केल्याने त्यांना नेहमीपेक्षा दुप्पट भाव मिळाला. ही थेट विक्री पद्धत यंदाही अवलंबली जात असून यामुळे हापूस निर्यातीत वाढ झालेली दिसत आहे. परदेशातून हापूसला वाढती मागणी असून हॉलंडला ४०० डझन आणि युकेला ४०० डझन आंबा पेटींची ‘मायको’द्वारे प्रथमच निर्यात करण्यात येत आहे. या निर्यात पेटींचा आरंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. ‘मायको’ या देशातील पहिल्या मँगोटेक प्लॅफॉर्मच्या माध्यमातून शेतकर्‍यांना बाजारपेठ थेट विक्रीसाठी उपलब्ध झाल्याने त्यांना योग्य तो मोबदलाही मिळत आहे.

कोकणातील हापूसचा सुगंध जगभर न्यायला हवा. शेतातील हापूस थेट बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करण्याची संकल्पना खरोखरच चांगली आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी असून त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या प्रत्येक उपक्रमाला आमचा पाठिंबा कायम राहील” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. ”लवकरच महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंबा बाजार आयोजित केला जाणार असून त्याला शासनातर्फे पूर्ण पाठिंबा असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. दरवर्षीप्रमाणे यंदाही बाजारपेठेत कोकणातील हापूसच्या नावाखाली कर्नाटकी आंब्याची विक्री होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होते शिवाय ग्राहकांना निकृष्ट दर्जाचे आंबे मिळत असल्याने त्यांची फसवणूक होते. हे सर्व निदर्शनास आणून देत योग्य ती पावले उचलण्याबाबत आम्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले” असल्याचे ‘ग्लोबल कोकण’चे संस्थापक संजय यादवराव म्हणाले. “‘मायको’ या हायटेक डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे कोकणातील जीआय टॅग हापूस जगभरातील आंबा प्रेमींना सहज उपलब्ध होत असून या प्लॅटफॉर्मला मुंबई, महाराष्ट्र आणि परदेशातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. असा आनंद ‘मायको’चे सीईओ दिप्तेश जगताप यांनी व्यक्त केला.

कोकणातील हापूस आंब्याचा उत्पादन खर्च खूप आहे. कोकण प्रदेशाची आणि कोकणातल्या शेतकऱ्यांची संपूर्ण अर्थव्यवस्था हापूस आंब्यावर अवलंबून आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने याबाबत योग्य ती पावले उचलणे गरजेचे आहे, असे चिपळूणचे आमदार शेखर निकम म्हणाले. पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासोबत आंबा भेसळीबाबत बैठक झाली असून सोबतच एपीएमसी, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, मुंबई, पुणे आणि सर्व बाजार समित्या, भेसळ प्रतिबंधक महाराष्ट्र शासन विभाग यांच्याकडेही पाठपुरावा करण्यात येणार आहे. एप्रिल अखेर आणि मे महिन्यात हापूस आंब्याचे भाव प्रचंड कमी होत असल्याने गेली दहा-पंधरा वर्ष कोकणातील हापूस आंब्याचा शेतकरी हा कर्जबाजारी होत आहे आणि याचे मुख्य कारण दक्षिण भारतातील हापूससारख्या दिसणाऱ्या आंब्याची कोकणातील हापूस म्हणून केली जाणारी फसवणूक आणि स्पर्धा आहे. या दोन्ही आंब्यांच्या चवीत, दर्जामध्ये तसेच सालीमध्येही फरक असतो. यावेळी मालवणचे आमदार वैभव नाईक, हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर धारिया उपस्थित होते.

कोकणातील हापूस आणि कर्नाटकातील आंब्यामध्ये फरक कसा ओळखायचा?
कोकणातील हापूस – आंब्याची वरची साल पातळ असते, गोलसर, आतमधून केशरी रंगाचा असतो.
कर्नाटकमधील आंबा – आंब्याची वरची साल जाड असते, खालच्या बाजूला निमूळता, आतमधून पिवळसर रंगाचा असतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button