अर्ध्या मंत्रिमंडळाचा मराठा आरक्षणाला विरोध : गिरीश महाजन

जळगाव : सध्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या अर्ध्या मंत्रिमंडळाचा मराठा आरक्षणाला विरोध आहे, अशा आरोप भाजप नेते गिरीश महाजन यांनी केला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यात कोण कमी पडलं. आरक्षण कशामुळं नाकारलं गेलं, याची संपूर्ण कल्पना संभाजीराजे छत्रपती यांना आहे. ते आमच्याच पक्षाचे खासदार आहेत. ७ तारखेला ते काय भूमिका जाहीर करतात ते पाहूया, असंही महाजन म्हणाले. संभाजीराजे छत्रपती यांनी पुढाकार घेत आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. पण सत्ताधारी आणि विरोधक मात्र अजूनही आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकमेकांवर हल्लाबोल करत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं आरक्षणाच्या मुद्द्यावरचं हे राजकारण आणखी रंगत जाणार हे नक्की आहे.
मोदी सरकारला केंद्रात दुसऱ्यांदा सत्तारूढ होऊन दोन वर्ष पूर्ण झाली. त्याच्या निमित्ताने जिल्हा भाजपच्या वतीनं दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले. जळगावातील पक्ष कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमानंतर गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना मराठा आरक्षणावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला.
यावेळी महाजन म्हणाले की, राज्यात आमचं सरकार असताना मराठा समाजाला परिपूर्ण असं आरक्षण देण्यात आलं होतं. आरक्षणाच्या अनुषंगाने तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण बाजू तयार करण्यात आली होती. त्यानंतरच आरक्षण दिलं गेलं होते. त्यावेळी उच्च न्यायालयात आरक्षणाला आवाहन देण्यात आलं होतं. मात्र, सरकारनं योग्य बाजू मांडल्यामुळं आरक्षणाच्या विरोधकांना यश आलं नाही आणि आरक्षण टिकलं होतं. दुर्दैवानं आमचं सरकार गेलं. त्यानंतर मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे सरकार योग्य पद्धतीने बाजू मांडू शकले नाही, म्हणून आरक्षण गेलं असा आरोप महाजन यांनी केला.
सर्वोच्च न्यायालयात आरक्षण नाकारण्यात आलं, त्याला भाजप सरकार जबाबदार नाही. महाविकास आघाडी सरकारचे वकील न्यायालयात बाजू मांडायला कमी पडले. म्हणूनच हे आरक्षण नाकारण्यात आलं. हे सरकार तीन पक्षांचं असल्यानं त्यांच्यात एकमेकांमध्येच मतभेद आहेत. मंत्रिमंडळातील अर्धे मंत्री आरक्षणाला विरोध करतात. म्हणूनच ही परिस्थिती निर्माण झाली आहे, असा आरोपही गिरीश महाजन यांनी यावेळी केला.