नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथील झालेल्या हिंसाचारावरुन शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा असं मी बोलणार नाही. पण महाराष्ट्रात जर असं काही घडलं असतं तर मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाने रस्त्यावर फुगड्या घातल्या असत्या, तांडव केलं असतं, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.
उत्तर प्रदेशमधील घटना ही राज्य, देशासह जगभरातील शेतकरी वर्गासंदर्भात एक कलंक आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवरती गोळ्या घालणं, गाडी घालणं हे ब्रिटीश काळात झालं आहे. जगभरात जिथे गुलामी, पारतंत्र्य आहे तिथे अशा घटना घडल्या आहेत. महाराष्ट्रात मुंबईमध्ये बाबू गेनू परदेशी कपड्याच्या विरोधात आंदोलनासाठी उतरला होता. त्याने ट्रक अडवला तर त्याच्या पोटावरुन गाडी घातली. जनरल डायरने पंजाबमध्ये अशाप्रकारे अत्याचार केले. यापेक्षा वेगळं लखीमपूर खेरीमध्ये वेगळं काय घडलं? हे आम्हाला तिथल्या सरकारने किंवा भाजपच्या सर्वोच्च नेत्यांनी समजावून सांगावं, एवढंच आमचं म्हणणं आहे, असं राऊत म्हणाले.
पंतप्रधान संवेदनशील, त्यांना लगेच हुंदका फुटतो
संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ या त्यांच्या मुखपत्रातील अग्रलेखात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खूप संवेदनशील आहेत, असं म्हटलं आहे. यावर बोलताना राऊत यांनी ते संवेदनशील आहेत, ते रडतात ना! त्यांना लगेच हुंदका फुटतो असं काही घडलं की…! ते खूप संवेदनशील आहेत. शेतकऱ्यांवरती ज्या पद्धतीने गाडी चालवली भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने त्यासंदर्भात त्यांना थोडे अश्रू आले पाहिजेत. प्रियंका गांधी यांना ज्या प्रकारे वागवलं त्या संदर्भातसुद्धा त्यांना अस्वस्थ वाटलं पाहिजे, असं राऊत म्हणाले.
राहुल गांधी यांच्यासोबत माझी काल सोमवारी चर्चा झाली. माझ्या माहितीप्रमाणे ते कदाचित उत्तर प्रदेशला जाण्याची शक्यता आहे आणि त्यांनी जायला पाहिजे. प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशमध्ये जाऊन ज्या प्रकारे आंदोलन केलं. त्यामुळे उत्तर प्रदेशमधील कष्टकरी वर्गामध्ये जागरुकता निर्माण झाली आहे, असं राऊत म्हणाले. राम मंदिर उभारतोय पण उत्तर प्रदेशमध्ये राम राज्य नाही, अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली.
गुजरातमध्ये सापडलेल्या २१ हजार कोटींच्या ड्रग्जचं काय?
बॉलिवडू अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान हा ड्रग्ज प्रकरणात सापडल्याने पुन्हा एकदा बॉलिवूड आणि ड्रग्ज कनेक्शन समोर आलं आहे. बॉलिवूड इंडस्ट्री मुंबईत असल्यामुळे मुंबईला टार्गेट केलं जात आहे. यावर शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी गुजरातमध्ये २१ हजार कोटींचं ड्रग्ज सापडलं त्यावर का सवाल विचारत नाही? असा परखड सवाल केला आहे.
मुंबईत ११ ग्रॅम ड्रग्ज आलं कुठून? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. बॉलिवूड, टॉलिवूड जे काही असेल ते सोडून द्या. पण या देशामध्ये गेल्या काही वर्षांपासून ड्रग्जचा पुरवठा होतोय तो कुठून होतोय? जम्मू-काश्मीर, गुजरातमध्ये ड्रग्ज सापडतात, महाराष्ट्रामध्ये ड्रग्ज सापडत आहेत. नोटबंदी करण्यामागचा मुख्य हेतू सरकारने सांगितला होता की अंमली पदार्थावरुन मिळणाऱ्या अतिरेक्यांच्या पैशांवर बंधणं येतील. तसंच, अंमली पदार्थांचा व्यापार थांबेल. उलट तो वाढला आहे. जगातील सगळ्यात मोठी खेप ही गुजरातमध्ये सापडली, त्यावर कोणीच प्रश्न विचारत नाही. त्यावर सरकार काहीच उत्तर देत नाही, असं राऊत म्हणाले. शेतकऱ्यांना चिरडण्याच्या विषयापेक्षा ११ ग्रॅम ड्रग्ज हा विषय मोठा नाही, असं राऊत म्हणाले.