Top Newsराजकारण

गुजरात हे विकासाचे मॉडेल, तर रातोरात मुख्यमंत्री का बदलला?; संजय राऊतांचा सवाल

मुंबई : कोठे काय बदलायचे हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे. भाकरी ही फिरवावीच लागते, पण एखादे राज्य जेव्हा विकास किंवा प्रगतीचे ‘मॉडेल’ असल्याचे आदळआपट करीत सांगितले जाते, तेथे अचानक नेतृत्वबदल घडवला की, मग लोकांच्या मनात शंका निर्माण होतात. भूपेंद्र पटेल यांच्यावर आता गुजरातचा भार पडला आहे. वर्षभरात विधानसभांच्या निवडणुका आहेत. पटेल यांना पुढे करून नरेंद्र मोदी यांनाच लढावे लागणार आहे. गुजरात मॉडेल म्हणायचे ते हेच काय? गुजरात राज्य जर विकास, प्रगतीच्या मार्गावर पुढे जात होते, तर मग अशा पद्धतीने रातोरात मुख्यमंत्री बदलाची वेळ का आली?, असा सवाल आजच्या सामना अग्रलेखातून विचारला आहे.

भूपेंद्र पटेल यांची निवड आमदारांकडून एकमताने झाली, पण भूपेंद्र यांनाही आपण मुख्यमंत्री होतोय हे माहीत नव्हते. गेल्या चार वर्षांत त्यांना साधे मंत्रीही केले नव्हते. ते एकदम मुख्यमंत्रीच झाले. दिल्लीहून नाव आले व ते भाजपच्या विधिमंडळ पक्षाने मान्य केले. नेता निवडीसाठी आमदारांनी मतदान केले असते तर दुसऱ्याच एखाद्या नावावर पसंतीची मोहोर उठली असती. काँग्रेस पक्षातही हे असेच घडते व यालाच आपल्याकडे लोकशाही म्हणावे लागते. लोकशाहीचे, राज्यकारभाराचे व विकासाचे गुजरात मॉडेल अशा प्रकारे फुगा फुटावा तसे टपकन फुटले आहे. गुजरात राज्य जर विकास, प्रगतीच्या मार्गावर पुढे जात होते, तर मग अशा पद्धतीने रातोरात मुख्यमंत्री बदलाची वेळ का आली?

विजय रूपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला तेव्हा पुढच्या दोन दिवसांत उपमुख्यमंत्री नितीन पटेल, गोवर्धन जदाफिया, मनसुख मांडवीय, सी. आर. पाटील अशी अनेक नावे चर्चेत आणून मीडियातील चर्वण पद्धतशीर सुरू ठेवले. आपण मोदींच्या जवळ आहोत व मोदींच्या मनात काय चालले आहे हे फक्त आपल्यालाच कळते असे अनेक पत्रकारांना वाटत होते व ते मोदी ‘यालाच’ किंवा ‘त्यालाच’ मुख्यमंत्री करतील असे सांगत होते. भूपेंद्र पटेल यांची मुख्यमंत्रीपदी नेमणूक करून मोदी यांनी या सर्व तथाकथित जवळच्या लोकांना अवाक् केले. ‘मी कोणाचा नाही, माझे कोणी नाही’ हाच संदेश मोदी यांनी दिला आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या ‘मन की बात’विषयी नेहमीच उत्सुकता असते. ज्या विषयांची कोणालाही कल्पना नसते असे अनेक विषय धुंडाळून मोदी ‘मन की बात’ व्यक्त करीत असतात. अगदी खेळण्यांपासून ते पाळण्यांपर्यंत, पण त्यांच्या मनात काय चालले आहे याचा शोध घेणे कठीण आहे, हे गुजरातच्या मुख्यमंत्री निवडीवरून स्पष्ट दिसले. भूपेंद्र पटेल हे गुजरातचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांचे नाव समोर आले तेव्हा ‘कोण हे महाशय?’ असा प्रश्न बहुतेक सगळय़ांनाच पडला.

आता भूपेंद्र पटेल कोण? हे गूढच मानायला हवे. ते पटेल समाजाचे आहेत व गुजरातमधील पटेल समाज भारतीय जनता पक्षावर नाराज असल्याने भूपेंद्रभाईंना मुख्यमंत्री केले. तसे पाहिले तर नितीन पटेलांपासून ते प्रफुल पटेल खोडापर्यंत अनेक ज्येष्ठ पटेल नेते तेथे होतेच. आमदारकीची पहिली टर्म आनंदीबेन पटेलांच्या कृपेने मिळवणाऱ्या, शेवटच्या बाकावर बसणाऱ्या भूपेंद्र पटेलांना मुख्यमंत्री करण्याचे कारण काय? पण धक्के देणे व फार झोतात नसलेल्या लोकांच्या हाती सत्ता देणे हेच मोदी राजकारणाचे तंत्र आहे. गुजरातमध्ये तेच घडले. मोदी यांनी अनेकदा अचानक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. महाराष्ट्रातही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देऊन ‘धक्का’ दिला होता. आता गुजरातमध्येही त्याच ‘धक्कातंत्रा’चा वापर झाला आहे.

गुजरातमध्ये बेरोजगारीचा भस्मासूर नाचतो आहे. अनेक मोठे उद्योग बंद पडले आहेत. अहमदाबादजवळच्या ‘फोर्ड’ गाड्या बनवणाऱ्या कंपनीने गाशा गुंडाळला व ४० हजार लोकांवर बेरोजगारीचे संकट कोसळले. संपूर्ण गुजरातमधील शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार तरुण आक्रोश करीत आहेत व निवडणुकांत या संतापाचा फटका बसेल ही खात्री असल्यानेच मुख्यमंत्री रुपाणी यांना बदलून भूपेंद्र पटेल यांना नेमले. ही फक्त रंगसफेदीच आहे. भूपेंद्र पटेल हे आनंदीबेन पटेल यांचे समर्थक आहेत. रूपाणी यांच्यामागे अमित शहा होते. त्यामुळे गुजरातमधील उद्याचे राजकारण जितके गोंधळाचे तितकेच रोचक असेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button