राज्यपाल-मुख्यमंत्री वाद पेटला ! ममतांनी जगदीप धनखड यांना ट्विटरवर केले ‘ब्लॉक’ !
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल जगदीप धनखड यांच्यातील वाद आणखीनच वाढला आहे. सोमवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जगदीप धनखड यांना ट्विटरवर ब्लॉक केले. ममता बॅनर्जी यांनी सोशल मीडिया साइट ट्विटरवर राज्यपालांना ब्लॉक करण्यामागे त्यांची मजबुरी असल्याचे सांगितली.
राज्यपाल जगदीप धनखड यांच्याशी झालेल्या मतभेदांवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, मला राज्यपाल जगदीप धनखड यांना ट्विटरवर ब्लॉक करण्यास भाग पाडले गेले आहे. ते रोज ट्विट करत सरकारी अधिकाऱ्यांना धमकावत होते, जणू काही आपण त्यांचे बांधलेले कामगार आहोत. ममता बॅनर्जी म्हणाल्या, राज्यपाल मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांनाही धमकावत आहेत.
धनखड यांनी रविवारी महात्मा गांधी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. मानवाधिकार पायदळी तुडवला जात असल्याच्या घटना आणि राज्यातील हिंसाचाराचा ‘पूर’ आपण पाहू शकत नाही, असे राज्यपाल म्हणाले होते.
कुठल्याही प्रकारचा ‘अपमान’ त्यांना कर्तव्य बजावण्यापासून रोखू शकत नाही. तसेच हिंसा आणि लोकशाही एकत्र नांदू शकत नाही, असे धनखड यांनी म्हटले होते. याच बरोबर, त्यांनी सर्वांना शांती आणि अहिंसेचे दूत बनण्याचे आवाहन केले, हीच महात्मा गांधींना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही ते म्हणाले होते.