सरकारी नोकरांना लॉकडाऊनमध्ये ५० टक्केच पगार द्यायला हवा होता : राजू शेट्टी
कोल्हापूर :लॉकडाऊन काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, कित्येकांचे रोजगार बुडाले. पण, सरकारी नोकरदारांना ५ ते १० टक्के उपस्थिती असतानाही संपूर्ण पगार मिळाला. घरी बसून सरकारी कर्मचाऱ्यांनी पगार घेतला. गेल्याच आठवड्यात त्यांना सरकारने महागाई भत्ताही दिला. वसंतदादा पाटील आज असते तर त्यांनी स्पष्टच सांगितलं असतं, सरकारी नोकरदारांनो, तुम्ही घरी बसून पगार घेतलाय, सरकार आता तुम्हाला ५० टक्के पगार देईन. आज ५० टक्के पगारावरच घर चालवा, असे वसंतदादांनी म्हटले असते, अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख, माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारी नोकरांना कोरोना काळात मिळालेल्या पूर्ण पगाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांना मिळालेल्या एफआरपी दरावरुन राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. मी आज कोणासोबतही नाही, मी केवळ शेतकऱ्यांच्याजवळ आहे. योग्य वेळ येताच मी माझी भूमिका स्पष्ट करेल असे म्हणत शेतकऱ्यांच्या एफआरपी आणि एफआरपीच्या तीन तुकड्यांबद्दलच्या मुद्द्यांवरु शरद पवार यांना लक्ष्य केले.
राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मिळणारी मदत तोकडी आहे, सरकारकडे पैसा नसल्याचं सरकार सांगत आहे. पण, अशा परिस्थितीने सरकारने पैसा उभा करायचा असतो. आज वसंतदादा पाटील यांची आठवण येते, ते असते तर त्यांनी शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवूनच निर्णय घेतले असते, असे म्हणत राजू शेट्टींनी शेतकऱ्यांबद्दलच्या सरकारी धोरणावर टीका केली.
शरद पवार आजही कारखानदारांचेच !
भाजपला शेतीतला काही कळत नाही, शेतीशी यांचा संबंध नाही, असे म्हणत सरकारने यांची मतं घेतली. जर, पवार मोदींचीच भाषा बोलणार असतील तर अवघड आहे. एफआरपीचे तुकडे करायच्या मुद्दयावर यांनी केंद्र सरकारच्या हो ला हो मिळवला. एफआरपीचे तुकडे शरद पवार पडू देणार नाहीत, असे म्हणतात. केंद्र सरकारच्या रमेशचंद्र समितीनेच तीन तुकड्यातील एफआरपीचा प्रस्ताव का दिला, असा प्रश्न राजू शेट्टी यांनी विचारला आहे.
कृषीमूल्य आयोग दरवर्षी एफआरपी जाहीर करत असते, मग याचवेळी एफआरपीसोबत एक नोट का दिली, की तीन तुकड्यांमध्ये एफआरपी द्यावी, याची जबाबदारी केंद्र सरकार का घेत नाहीत, असे म्हणत सर्वच राजकीय पक्ष एक असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले. शरद पवार हे कारखानदारांच्याच बाजुने आहेत, पवारांनी असं व्हायला पाहिजे, असे म्हटल्यास, आम्हीही तसेच म्हणावे असे थोडीच आहे. आम्ही काय त्यांचे गुलाम आहोत का? असे म्हणत राजू शेट्टींनी शरद पवार यांच्या भूमिकेला आपलं समर्थन नसल्याचं स्पष्ट केलं.