अमरनाथ यात्रा सलग दुसऱ्या वर्षी रद्द

जम्मू : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा देशाला मोठा तडाखा बसला. कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत असली, तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर जम्मू आणि काश्मीर प्रशासनाने अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सलग दुसऱ्या वर्षी अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली आहे.
अमरनाथजी श्राईन बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी ही यात्रा रद्द करण्याची घोषणा केली असून, भाविकांना २८ जूनपासून ऑनलाइन दर्शन घेता येईल, अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे. अमरनाथ यात्रा २८ जूनपासून सुरू होऊन २२ ऑगस्ट रोजी समाप्त होणार होती. एकूण ५६ दिवस ही यात्रा सुरू राहणार होती. भारतासह जगाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक या ठिकाणी दर्शनाला येत असतात.
दरम्यान, एप्रिल महिन्यात अमरनाथजी श्राईन बोर्डाने पवित्र गुफेची यात्र रद्द करणार असल्याचे म्हटले होते. यासंदर्भात पत्रकही जारी करण्यात आले होते. परंतु काही कालावधीच जम्मू काश्मीर माहिती संचालनालयाने यात्रा रद्द करण्याचा आदेश मागे घेतला होता. दरवर्षी जून महिन्यात अमरनाथ यात्रेचे आयोजन करण्यात येते.
अमरनाथजी श्राईन बोर्डाने घेतलेल्या निर्णयावर जम्मू चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रमुख अरुण गुप्ता यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयामुळे व्यापारी समुदायाची निराशा झाली आहे. याचा थेट परिणाम त्यांच्या व्यवसायांवर होईल. शासनाने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा. यात्रा रद्द करण्यापेक्षा भाविकांच्या संख्येवर मर्यादा आणली जाऊ शकते, असे गुप्ता यांनी म्हटले आहे.