गोव्यातील मृत्यूतांडवानंतर मुख्यमंत्री बदलाची मागणी

पणजी : ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे गोव्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा सातत्याने वाढत असल्यामुळे आता राज्य सरकारला हादरे बसायला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वीच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्यातील अंतर्गत कलह समोर आला होता. त्यानंतर आता विरोधकांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेऊन संपूर्ण कारभार टास्क फोर्सच्या हाती द्यावा, अशी मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांनी केली. गोव्यात शनिवारी पहाटे ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे आणखी १३ जणांचा मृत्यू झाला. गोव्यात आतापर्यंत एकूण २ हजारच्या जवळपास कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ऑक्सिजनअभावी झालेल्या मृतांचा आकडा भयावह आहे.
ऑक्सिजनअभावी आजपर्यंत ८३ रुग्णांचा बळी गेला आहे. या पार्श्वभूमीवर विजय सरदेसाई यांनी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना धारेवर धरले.
ऑक्सिजनअभावी रुग्णांच्या होणाऱ्या मृत्यूसाठी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्रीच जबाबदार आहेत. गोवा सरकार पैसे कमवणे आणि उधळण्यात व्यस्त आहे. मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांमध्ये कोणताही समन्वय उरलेला नाही. ऑक्सिजन टँकरसाठी प्रशिक्षित ड्रायव्हर जर कोल्हापूरमधून आणावे लागत असतील तर मुख्यमंत्रीही कोल्हापुरातूनच आणावा, अशी खोचक टिप्पणी विजय सरदेसाई यांनी केली.
गोव्यात ऑक्सिजनअभावी मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. इथे दररोज श्वास गुदमरुन अनेकांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे गोव्यात अक्षरश: मृत्यूचं तांडव उभं आहे. सलग चौथ्या दिवशी ऑक्सिजनअभावी १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात गुरुवारी मध्यरात्री ते शुक्रवारी पहाटे सहा वाजेपर्यंत आणखी १३ कोरोना रूग्णांचा तडफडून मृत्यू झाला. प्राणवायूअभावी आजपर्यंत ८३ रुग्णांचा बळी गेला आहे. उच्च न्यायालयाने याच विषयावर सरकारला फटकारले असूनही रुग्ण दगावण्याचे सत्र सुरुच आहे. परिणामी गोव्याचे आरोग्य खाते तोंडावर पडले आहे.