

‘ग्लोरियस क्राऊड’ त्यांच्याच वाट्याला येते ज्यांच्या डोक्यावर समाजातील प्रत्येक घटकाने आपुलकीचा, विश्वासाचा अदृश्य असा ‘क्राऊन’ मनापासून ठेवलेला असतो. अॅड. विवेकानंद रामकृष्ण जगदाळे या विलक्षण माणसाच्या भोवती अशी गौरवशाली गर्दी आणि त्या गर्दीच्या प्रेमात बुडालेला हा दर्दी वकील माझ्यासह अनेकांनी अनुभवलेला आहे. ‘हातांनी जे पेरावं तेच उगवून हाती पडतं ॥ श्रमणाऱ्या हातांनीच जीवनाला वैभव चढतं ॥’ हे तंतोतंत ज्यांना लागू पडते त्या अॅड. जगदाळे यांच्या कार्यकर्तृत्वाला त्यांच्या क्रिकेटवेडाला अनेकार्थाने सलामच करायला हवा. आई-वडिलांनी दिलेल्या संस्काराचा, सामाजिक कार्याचा वसा घेत जन्मभूमी, कर्मभूमीवर नितांत प्रेम असणारा, मातीशी जोडलेली नाळ कधीच तुटणार नाही यासाठी प्रयत्नशील असणारा, माणसे जोडणारा हा ध्येयवेडा वकील त्याच्यातील सच्चेपणाने, दिलदारीने इतरांपेक्षा वेगळा ठरतो, हे मान्य करावंच लागतं! आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अथक परिश्रम तर हवेच, पण त्याला श्रद्धेची, विश्वासाची जोडही हवी. हा विश्वास असतो म्हणूनच तर विठ्ठलाच्या भेटीने पंढरपुरी प्रवास करणारी वारी हा फक्त वैष्णवांचा मेळा उरत नाही तर अवघाची रंग एक झाला अशा भावनेतून समाजातील प्रत्येक घटक जातपात, धर्म, श्रीमंत, गरीब असे भेद विसरून मनोभावे विठ्ठलाच्या सेवेत एकरुप होवून जातात. टाळ-मृदुंगाच्या गजरात ही विठ्ठलनामाची शाळा आयुष्याचे सार शिकवते, जगणे समृद्ध करते… काहीसे असेच भारावलेले वातावरण असते नाशिकमध्ये रंगणाºया क्रिकेट सामन्यांच्या कालावधीत. या सामन्यात, टीममध्ये आपली निवड व्हावी यासाठी राज्यातील अनेक वकील खेळाडू आशावादी असतात. आषाढी वारीला जसे विठ्ठलाच्या ओढीने वारकरी मार्गस्थ होतात अगदी तसेच वर्षभर वकिली व्यवसायाच्या ताण-तणावात काळ्या कोटाआड आपली आवड निवड थोडी बाजूला ठेवत कार्यरत असणाºया वकिलांमधील खेळाडू जस जसा मार्च, डिसेंबर उजाडतो तस तसे नाशिकस्थित क्रिकेटवेड्या वकिलाचा कौल येण्याची आतुरतेने वाट पाहात असतात. एकदा का हा कौल आला की मग ‘मी तू पण गेले वाया’ म्हणत सारे झपाटल्यासारखे, स्पर्धा कुठेही असली तरी आनंददायी ठरावी यासाठी एक होतात. गत ३० वर्षांपासून अॅड. विवेकांनद जगदाळे हे नाव वकिलांच्या क्रिकेटसोबत जोडले गेले आहे. ‘गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनटी’ असा गौरव केला जाणारा हा खेळ आणि या खेळासोबत जगदाळे यांची बहरत गेलेली वकिली, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरही विखुरलेला मित्रांचा मेळा… यंदा जिद्दीने, हट्टाने आणि मित्रांच्या विश्वासाने साकारले जाणारे ‘महाराष्ट्र अॅडव्होकेट्स प्रिमियम लिग’च्या चौथ्या पर्वाचे शानदार यजमानपद… सारंच अवाक करणारं… ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील एका सामान्य मुलाची ही संघर्षातून घेतलेली असामान्य झेप, निश्चितच कौतुकास्पद मानावी लागेल. आपली आवड आणि मिळालेली संधी यांची उत्तम सांगड घालताना माणसे दुखावली जाणार नाहीत याकरीता प्रसंगी दोन पावले मागे जात पुन्हा दुप्पट वेगाने यशाकडे मार्गस्थ होणारा हा मनस्वी वकील एक माणूस म्हणून सर्वानाच आपलासा वाटतो. गौरवशाली गर्दीचा मानकरी ठरतो.
पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई येथील प्रथितयश मराठी दैनिकांत १५ वर्षांच्या पत्रकारितेनंतर मी जेव्हा नाशिकमध्ये वकिली सुरु करायची ठरवली तेव्हा पहिला प्रश्न होता, गुरु कोण…? अर्थात माझा क्रिकेटप्रेमी भाऊ, कर्जतच्या अॅड. योगेश देशमुखमुळे याला सक्षम उत्तर मिळालं, ते म्हणजे अॅड. विवेकानंद जगदाळे… चेंबर जॉईन केल्यावर पहिले आठ-दहा दिवस तर हा माणूस वकील आहे की राजकीय पुढारी, शेतकरी आहे की खेळाडू, हा खरेच प्रॅक्टिस करतो का..? असे प्रश्न मला पडल्यावाचून राहिले नाहीत. शिकण्याच्या प्रवासात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे, प्रवाहाच्या विरुद्ध पोहणे हा जणू जगदाळेंचा स्वभावधर्म. लहानपणापासून वडिलांकडून मिळालेल्या सामाजिक सहिष्णुतेच्या जाणिवेतून समाजाप्रती आपले काही उत्तरदायीत्व आहे या निखळ भावनेतूनच स्व. रामकृष्ण जगदाळे फाऊंडेशन, कृष्णा क्रिकेट अॅकॅडमी आणि नाशिक डिस्ट्रिक्ट अॅडव्होकेट्स क्रिकेट अॅण्ड स्पोर्टस असोसिएशन या संस्था आकाराला आल्या. झेपेल तेच करेन आणि जे करेन ते सर्वोत्तम असेल, शब्द तोच देईन जो पूर्ण करु शकेन, असाच काहीसा व्होरा ठेवून मार्गक्रमण करणाऱ्या ‘आहे रे’ गटापेक्षा ‘नाही रे’ गटामध्ये अधिक रमणाऱ्या अॅड. जगदाळेंच्या असंख्य कर्मफुलांचे हार कोणता देव नाकारेल, हाच प्रश्न पडावा. या सर्वात त्यांना त्यांची आई, अर्धंगिनी सौ. संगिता, मुली वेदांती, तुळजा आणि लेक कृष्णा या सर्वांचीच अनमोल साथ मिळते आहे.
अनेक अडचणींवर मात करीत वकिलांच्या क्रिकेट स्पर्धांना अॅड. जगदाळे यांनी अत्यंत दूरदृष्टीने एका उंचीवर नेले आहे. या स्पर्धांना मिळालेले कार्पोरेट ग्लॅमर, राज्य पातळीवरील वाढता सहभाग, वकिलांना वाटणारी क्रेझ आणि सातत्याने मान्यवरांकडून मिळणारी शाबासकी अशा सर्वच घटकांमुळे या स्पर्धांना गुणात्मकता देण्याची जबाबदारी अॅड. जगदाळे निश्चित पार पाडतील यात शंका नाही. यंदाच्या या स्पर्धेतील सर्वात आश्वासक बाब म्हणजे ‘एमएपीएल’च्या राज्यातील सर्व पालक वकिलांनी मिळून वकिलांसाठी एका ‘वेल्फेअर फंड’ची निर्मिती करण्याचे योजले आहे. या फंडाचा योग्य विनियोग करण्यासाठी आवश्यक नियमावलीला नजीकच्या काळात अंतिम स्वरुप प्राप्त होईल. नवोदित अथवा अनुभवी वकिलांच्या हितार्थ ठोस कृतीशील कार्यक्रम राबवण्याची गरज निर्माण झाली आहे. या सांघिक भावनेतूनच या ‘वेल्फेअर फंडा’ची निर्मिती करावी असे प्रयत्न अॅड. जगदाळेंनी कोरोना काळापासूनच सुरु ठेवले होते. त्या काळात अनेक वकील मित्रांना गमावल्याचं दु:ख सर्वांनीच अनुभवले आहे. अशा प्रसंगानंतर त्यांच्या कुटुंबाप्रती संवेदनशीलता बाळगून काही आर्थिक नियोजन करावे यासाठी सर्वांचेच हात हातात असले तरच हे धनुष्यबाण पेलता येईल असा हेतू यामागे आहे. अॅड. जगदाळेंच्या या आवाहनालाही महाराष्ट्रातून उत्तम प्रतिसाद मिळेल याची खात्री आहे.
आजपर्यंत विविध पातळीवर आपल्यातील माणुसकीची ओळख टिकवणाऱ्या अॅड. जगदाळेंनी आपल्या कामाची प्रसिध्दी केली नाही किंवा बोटभर कामाची हातभर जाहिरात करत ते कधी फिरले नाहीत. वकिलांच्या क्रिकेट स्पर्धांना एक निर्णायक आयाम मिळण्याच्या या यशस्वी टप्प्यावर त्यांच्या यशाचे पैलू त्यांच्यावर प्रेम करणाºया प्रत्येकाने जाणून घेतले पाहिजेत, याच एका भावनेने आम्ही या विशेषांकाचे नियोजन अॅड. जगदाळे यांच्या अपरोक्ष केले. ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत पोहोचलो त्यांनी सर्वांनीच उत्तम आठवणींचा संग्रह, छायाचित्रे आम्हाला उपलब्ध करुन दिली. अनेकांना बहुदा त्यांच्या व्यस्ततेमुळे आमच्याशी संवाद साधणे शक्य झाले नाही आणि काहीजणांपर्यंत पोहोचणे आम्हाला शक्य झाले नाही. मात्र दृश्य अदृश्य असे सर्वचजण अॅड. जगदाळेंचे हितचिंतकच आहेत. त्यांच्या सदिच्छा अॅड. जगदाळेंसोबत कायम असतील यात शंका नाही. महाराष्ट्र अॅडव्होकेट्स प्रिमियम लिग २०२४ च्या उदघाटनप्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूती दीपांकर दत्ता, न्या. मकरंद कर्णिक, न्या. संदीप मोरे, न्या. किशोर संत, न्या. गोविंद सानप, न्या. शिवकुमार दिगे, जल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांच्या प्रमुख उपस्थितीत अॅड. विवेकानंद जगदाळे यांच्या आजवरच्या वकिलांच्या क्रिकेटसाठी त्यांनी दिलेल्या योगदानावर आधारीत ‘ऑल राऊंडर’ हा विशेषांक प्रकाशित होतो आहे, ही आमच्या संपूर्ण टीमसाठी, अॅड. जगदाळेंवर विशेष प्रेम करणाऱ्या सर्वांसाठी कौुतकाची, अभिमानाची, सन्मानाची बाब आहे. यासाठी आम्हाला सहकार्य करणाऱ्या प्रत्येक घटकाचे मनापासून आभार. गौरवशाली गर्दीचा दिमाखदार मानकरी असणाऱ्या अॅड. विवेकानंद जगदाळेंना पुढील वाटचालीस आमच्या हार्दिक शुभेच्छा….