Top Newsराजकारण

मुश्रीफांचे घोटाळे बाहेर काढा, फडणवीस आणि चंद्रकांत दादांची सूचना : सोमय्या

कराड : भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचा घणाघाती आरोप केला आहे. गडहिंग्लजच्या आप्पासाहेब नलावडे सहकारी कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत, हसन मुश्रीफ आणि आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याचा काय संबंध? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. एवढेच नाही, तर मुश्रीफांचे घोटाळे जनतेसमोर मांडा, अशी सूचना आपल्याला खुद्द देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी दिली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ते कराड पोलिसांनी कोल्हापूरला जाण्यापासून रोखल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.

सोमय्या म्हणाले, हसन मुश्रीफ आणि आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याचा संबंध काय? हसन मुश्रीफ आणि परिवाराने आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी कारखान्यात १०० कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. एवढेच नाही, तर २०२० मध्ये कुठल्याही पारदर्शकतेशिवाय हा कारखाना ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला देण्यात आला. ब्रिक्स इंडिया कंपनी ही बेनामी कंपनी आहे. हसन मुश्रीफांचे जावई या कंपनीचे मालक आहेत. या कंपनीचीही चौकशी व्हायला हवी, अशी आमची मागणी आहे, असेही सोमय्या म्हणाले.

कोलकात्याच्या शेल कंपन्यांच्या नावाने पैसे उभारले गेल्याचा आरोप करत, या घोटाळ्यासंदर्भात आपण ईडीकडे कागदपत्रे देऊन उद्या तक्रार करणार आहोत, असेही किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर कारखान्यातील ९८ टक्के शेअर्स हे एका बैनामी कंपनीचे आहेत. कोणताही साखर कारखाना चालवण्याचा अनुभव नसलेल्या कंपनीकडे जबाबदारी का दिली गेली. हे शरद पवारांना जास्त माहीत आहे. असेही सोमय्या यांनी म्हटले आहे. या घोटाळ्याची चौकशी व्हायला हवी, अशी आमची मागणी आहे, असेही सोमय्या यांनी म्हटले आहे. याच वेळी, आपण पुढच्या आठवड्या पुन्हा भेटणार आहोत आणि हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा मी उघडकीस आणणार आहे, असा इशाराही सोमय्या यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री अन् रश्मी ठाकरेंच्या बेनामी मालमत्तेच्या चौकशीसाठी अलिबागला जाणार

अलिबाग आणि जरंडेश्वर येथेही उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी केलेल्या चुकीच्या व्यवहारांची माहिती घेण्यासाठी जाणार आहे. सोमवारी अलिबाग येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांच्या नावाने घेतलेल्या बेनामी मालमत्तेची चौकशी करण्यासाठी जाणार असल्याचे किरीट सोमय्यांनी म्हटले. त्यांनी ठाकरे सरकारवर टीका करत, महाविकास आघाडीचे जनक शरद पवारांनाही लक्ष्य केले. हसन मुश्रीफ साहेब १२७ कोटी रुपये आपल्या कंपनीत मनी लाँड्रिंगचे आले, त्याचा हिशेब अजून का दिला नाही? शरद पवार साहेब ही तुमची व्यूहरचना आहे का? असा सवाल सोमय्या विचारला आहे.

कारवाईला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

गणेश विसर्जनादिवशी सकाळी मला माझ्याच कार्यालयात ४ तास रोखण्यात आलं. मला का रोखण्यात आलं याचं उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील देणार का? मला कोल्हापूरात प्रवेशबंदी आहे. मग मुंबईत मला का रोखलं जातंय? कोल्हापूरच्या वेशीवर रोखा, असं म्हणत सोमय्यांनी पोलिसी कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मला कोल्हापूरपर्यंत पोहोचू दिलं जाणार नाही. हसन मुश्रिफांमुळे किरीट सोमैय्याला कोल्हापूरच्या अंबेमाईचं दर्शन करता आलं नाही, असे म्हणत सोमैय्यांनी पत्रकार परिषदेची सुरुवात केली.

घोटाळेबाजाऐवजी, घोटाळा उघड करणाऱ्यांनाच ठाकरे सरकारने अटक केली. मला कोल्हापूर जिल्हा प्रवेशबंदी करण्यात आली. कागल येथे हसन मुश्रीफ यांचा दौरा आहे, त्याचवेळेस सोमय्या कोल्हापूरात येत आहेत. त्यामुळे, गनिमी काव्याने किरीट सोमय्यांवर हल्ला होण्याची शक्यता आहे, असे मला पत्रातून कळविण्यात आले आहे. हसन मुश्रीफ यांच्या स्वागताला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते येणार होते की राष्ट्रवादीचे गुंड. राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच गुंड आहेत का? असा प्रश्न किरीट सोमय्या यांनी विचारला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button