Top Newsराजकारण

गौतम गंभीरचा नवज्योत सिंग सिद्धूंवर संताप

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. नवज्योत सिंग सिद्धू यांनी नुकतंच एका कार्यक्रमात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा उल्लेख मोठा भाऊ म्हणून केला होता. सिद्धू यांच्या याच विधानावरुन आता गदारोळ उडाला आहे. माजी क्रिकेटपटू आणि भाजपाचा खासदार गौतम गंभीर यानं आता या वादात उडी घेतली असून सिद्धूंवर कठोर शब्दात टीका केली आहे. गंभीर यानं सिद्धू यांच्या वक्तव्यावर उद्देशून एक सूचक ट्विट केलं आहे. आधी आपल्या मुलांना सीमेवर लढण्यासाठी पाठवा मग दहशतवाद पसरवणाऱ्या देशाच्या प्रमुखाला मोठा भाऊ म्हणा, असा खोचक टोला गंभीरनं सिद्धू यांचं नाव न घेता लगावला आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे देखील पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू राहिले आहेत. तर नवज्योत सिंग सिद्धू व गौतम गंभीर देखील भारतीय संघाकडून क्रिकेट खेळले आहेत. त्यामुळे तीन माजी क्रिकेटपटूंमध्ये आज राजकीय रिंगणात सामना रंगल्याचं पाहायला मिळत आहे. पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. नवज्योत सिंग सिध्दू यांच्याकडे पंजाब काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद देण्यात आलं आहे. पण माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासोबतचा मोठ्या वादानंतर सिद्धू यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागली आहे.

नवज्योत सिंग सिद्धू जेव्हा करतारपूर बॉर्डरवर पोहोचले तेव्हा त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं होतं. याचवेळी इम्रान खान यांच्याबाबत सिद्धू यांनी वक्तव्य केलं होतं. इम्रान खान हे माझ्या मोठ्या भावासारखे असून त्यांनी मला खूप प्रेम दिलं आहे, असं विधान सिद्धू यांनी केलं होतं. भाजपाचे नेते अमित मालवीय यांनी याचा व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केला होता. त्यानंतर सिद्धू यांच्यावर विरोधकांकडून जोरदार टीकेला सुरुवात झाली आहे.

मूळ मुद्दा बाजूला ठेवून टीका- सिद्धू

सिद्धू यांनी पाकिस्तानातील कर्तारपूरला पोहोचले. तेथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या स्वागतामुळे भावूक झालेले सिद्धू यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना ‘बडे भाई’ अशी उपमा दिली. त्यानंतर अनेक भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना सिद्धू म्हणाले, हल्ली लोक कोणत्याही गोष्टीचा बाऊ करतात. भाजपला काय टीका करायची आहे, ती करू द्या. मी फक्त गुरुद्वाऱ्यात दर्शनासाठी गेलो होतो. याआधीही अशी टीका झाली आहे. मूळ मुद्द्यावरून लक्ष हटवण्याचे हे प्रयत्न आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button