
मुंबई : चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी वाढ होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. गृहमंत्रालयातील एक अत्यंत गोपनीय फाईल चोरीला गेली असून ती परमबीरांचे निकटवर्तीय असलेल्या संजय पुनामिया यांच्या मोबाईलमध्ये आढळली आहे. परमबीर सिंगांना गुन्ह्यात मदत करण्यासाठी ही फाईल चोरल्याचा संशय पोलिसांना असून या प्रकरणी संजय पुनामिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यातील गृहविभाग आणि केंद्रीय तपास सस्थांमधील गोपनीय पत्रव्यवहार खाजगी व्यक्तीच्या कस्टडीत कसा गेला असा सवाल विचारला जात आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंह यांच्या कारवाई संदर्भातील गृहविभागातील ही फाईल असल्याची माहिती समोर आली आहे. परमबिर सिंह यांचे मानले जाणारे निकवर्तीय संजय पुनामिया आणि इतर आरोपींच्या विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय पुनामिया यांच्या मोबाईलमध्ये २७ पानांची ही फाईल मिळाली आहे. ही फाईल गोपनीय असल्याने कोणत्या ही विभागाकडे किंवा माहितीच्या अधिकारात दिली नसताना पुनामिया यांच्याकडे कशी आली? संजय पुनामिया यांनी ही २७ पानांची फाईल त्यांचा मुलगा सनी पुनामिया याला मोबाईलवरुन पाठवल्याच प्राथमिक तपासात उघड झालं आहे.