राजकारण

गणपतराव देशमुख यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

सोलापूर : शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता अश्विनी हॉस्पिटल सोलापूर येथे उपचार दरम्यान निधन झाले. वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी ३.३० वाजता त्यांच्या पार्थिवावर शेतकरी सहकारी सूतगिरणी सांगोला येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. ज्येष्ठ सुपुत्र पोपटराव देशमुख, चंद्रकांत देशमुख, नातू डॉ. बाबासाहेब आणि अनिकेत देशमुख यांनी गणपतराव देशमुख यांच्या मृतदेहाला भडाग्नी दिला. गणपतरावांच्या पत्नी रतनबाई देशमुख यांना पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते तिरंगा ध्वज देण्यात आला. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, शेकापचे जयंत पाटील, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते पाटील, माजी खासदार राजू शेट्टी आदी उपस्थित होते.

एकाच मतदारसंघात एकाच पक्षाच्या नेत्याला चार पिढ्यांनी मतदान केलेले ते राज्यातील एकमेव नेते होते . म्हणूनच त्यांना विधिमंडळाचे विद्यापीठ नावाने संबोधले जायचे. काही दिवसापासून त्यांना रेटिनाचा त्रास सुरु झाल्याने त्यांची दृष्टी गेली होती. यातच आता आपला समाजाला उपयोग नसेल तर किती दिवस जगायचे अशी भावना ठेऊन त्यांनी अन्नत्याग केला होता. आयुष्यभर तत्वाने जगणारे गणपतराव हे लाखो शेकाप कार्यकर्त्यांचे श्रद्धा स्थान होते . गणपतराव यांच्या पित्ताशयात खडे झाल्याने त्यांना उपचारासाठी सोलापूर येथील अश्विनी हॉस्पिटल मध्ये हलविण्यात आले होते. येथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यावर त्यांची तब्येत स्थिर होती. मात्र काल सायंकाळी पुन्हा तब्येत ढासळल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

गणपतराव देशमुख याना पाणीदार नेते म्हणून राज्यभर ओळखले जायचे. दुष्काळी सांगोला तालुक्यासाठी त्यांनी टेम्भू म्हैसाळ येथील पाणी आणून डाळिंबाचे स्विझर्लंड म्हणून नवी ओळख निर्माण केली होती. सांगोला शहरासह तालुक्यातील ७२ गावांसाठी शिराबावी योजना करून त्यांनी थेट चंद्रभागेचे पाणी सांगोल्यात नेले होते. आयुष्यभर आपल्या तत्वांचे राजकारण करणारे गणपतराव दोनदा मंत्री झाले पण त्यांचे मुख्य काम हे विरोधी पक्षातच ठळकपणे दिसून आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button