राजकारणशिक्षण

कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ : उदय सामंत

मुंबई : कोरोनाच्या काळात ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा मृत्यू झाला आहे अशा अकृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी एका वृत्तवाहिनीला ही माहिती दिली आहे. या निर्णयामुळे पालक गमवलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये घरातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे. कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आई, वडिल गमावले आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अकृषी विद्यापीठांची फी कमी करण्याचा तत्वत: निर्णय झाला आहे. त्यामुळे उद्यापर्यंत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठाच्या कुलगुरुंसोबत शुल्काबाबत दुपारी चार वाजता बैठक झाली. सुमारे एक तास ही बैठक पार पडली.

ट्युशन फी वगळता इतर विद्यापीठ शुल्क जसे की ग्रंथालय, कॉम्पुटर लॅब, जिमखाना हे बंद असताना या गोष्टींची फी कमी करता येईल का? याबाबत चर्चा विद्यापीठ कुलगुरूसोबत या बैठकीत करण्यात आली. कुलगुरूंसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. त्यामुळे विद्यापीठाच्या शुल्कामध्ये कपात होऊन विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

प्रत्येक विद्यापीठांचे फी स्ट्रक्चर वेगवेगळे आहेत. त्यामुळे कोणत्या विद्यापीठांचे शुल्क किती कमी होणार यासंदर्भात संध्याकाळी कुलगुरु चर्चा करतील आणि त्यानंतर उद्यापर्यत यासंदर्भातला निर्णय येईल अशी माहिती सामंत यांनी दिली आहे. यात संलग्न विद्यापीठाला असलेली महाविद्यालये आणि असंलग्न विद्यापीठाला असलेल्या महाविद्यालयांची फी किती कमी होईल याचे माहिती येईल. ज्यात वेगवेगळ्या विद्यापीठात ग्रंथालय, जिमखाना याचे वेगवेगळे शुल्क असल्याने यासंदर्भातला निर्णय उद्यापर्यंत टळला आहे.

दोनच दिवसापूर्वी कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतला होता. परीक्षा शुल्क माफ करावे किंवा फीमध्ये कपात करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत होती. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button