आरोग्य

दिल्लीकरांना लस मोफत : केजरीवाल

नवी दिल्ली : देशातील कोरोना संकट पाहता दिल्ली सरकारनं १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. लसीकरण वेगाने व्हावं यासाठी दिल्ली सरकारने १.३४ कोटी लसींची ऑर्डर दिली आहे. १ मे पासून दिल्लीत लसीकरण मोठ्या प्रमाणात केलं जाईल असंही मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितलं. मोफत लसीकरणाचा दिल्लीतील सामान्य जनतेला फायदा होईल असंही त्यांनी पुढे सांगितलं.

यावेळी केजरीवाल यांनी लसींच्या दरावरून टीकेची झोड उठवली. केंद्र, राज्य आणि खासगी रुग्णालयांना एकाच किंमतीत लस मिळाली पाहीजे अशी आग्रही मागणी त्यांनी केली. लस निर्मिती करण्य़ाऱ्या कंपन्याचा दावा आहे की, १५० रुपये फायदा होतो.मग वेगवेगळे दर का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. नफा कमवण्यासाठी पूर्ण आयुष्य पडलं आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच केंद्र सरकारने यात दखल घेत दर निश्चित केले पाहीजेत अशी सूचनाही केली.

लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याचं जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे सीरम इंस्टीट्यूट आणि भारत बायोटेकनं लसींचे दर निश्चित केले आहेत. यात कोविशील्ड राज्य सरकारला ४०० रुपये, खासगी रुग्णालयांना ६०० रुपयात मिळणार आहे. तर कोवॅक्सिन राज्य सरकारला ६०० रुपये, खासगी रुग्णालयांना १२०० रुपयात मिळणार आहे. दूसरीकडे ही लस केंद्र सरकारला १५० रुपयात दिली जाणार आहे. त्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button