फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूअल मॅक्रॉन यांच्या कानशिलात लगावली; दोघांना अटक

पॅरिस : गेल्या वर्षी इस्लामवर वादग्रस्त वक्तव्य केल्यावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूअल मॅक्रॉन यांना आज एका व्यक्तीने कानशिलात लगावली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
फ्रान्सच्या सैन्याला सेवा देणाऱ्या एका गटाने नुकतीच मॅक्रॉन यांना इस्लामवरून इशारा दिला होता. इस्लाम धर्माला सवलती दिल्याने फ्रान्सचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या सैनिकांच्या गटाचे पत्र Valeurs Actuelles नियतकालिकात काशित झाले होते. या नियतकालिकामध्ये गेल्या महिन्यातही अशाप्रकारचे आणखी एक पत्र प्रकाशित झाले होते. यामध्ये गृह युद्धाचा इशारा देण्यात आला होता. मात्र, य़ा पत्राला मॅक्रॉन यांचे सहकारी जेराल्ड डारमेनिन यांनी असफल प्रयत्न असे म्हटले होते. तसेच पत्र लिहिणाऱ्यामध्ये हिम्मत नाहीय, असे म्हटले होते.
दरम्यान, मॅक्रॉन हे दक्षिण पूर्वेकडील शहर वॅलेन्समध्ये गेले होते. तेव्हा ते एका सभागृहातून बाहेर पडत असताना त्यांची वाट पाहत थांबलेल्या लोकांकडे गेले आणि त्यांच्याशी हस्तांदोलन करत बोलत होते. तेव्हा एका व्यक्तीने त्यांच्याशी हस्तांदोलन केले आणि त्यांच्या कानशिलात लगावली. यानंतर लगेचच मॅक्रॉन यांना सुरक्षा रक्षकांनी मागे खेचले आणि सुरक्षित स्थळी घेऊन गेले. व्हिडीओमध्ये कानाखाली लगावल्याचा आवाज स्पष्ट ऐकू येत आहे.