
लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये आज (बुधवार) चौथ्या टप्प्यात ९ जिल्ह्यांतील ५९ जागांवर मतदान होत आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ, रायबरेली, पिलीभीत, लखीमपूर खेरी, सीतापूर, हरदोई, फतेहपूर, बांदा आणि उन्नावमधील या जिल्ह्यात मतदान होणार आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत आजची मतदान प्रक्रिया चालणार आहे.
या टप्प्यात एकूण २.१२ कोटी मतदार मतादानाचा हक्क बजावणार आहेत. या टप्प्यात ६२४ उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. २०१७ मध्ये झालेल्या गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने या ५९ पैकी ५१ जागा जिंकल्या होत्या. याशिवाय समाजवादी पार्टीला चार, बसपाला तीन आणि भाजपचा मित्रपक्ष अपना दलला एक जागा मिळाली होती. काँग्रेसला मात्र, या ५९ जागांपैकी २०१७ मध्ये एकही जागा जिंकता आली नव्हती. मात्र, यावेळी तेथील समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे, सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार ताकद पणाला लावली आहे. भाजपसमोर आपलं वर्चस्व कायम ठेवण्याचे मोठं आव्हानं आहे.
चौथ्या टप्प्याचा प्रचार अत्यंत ‘हाय व्होल्टेज’ होता. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारात जोरदार ताकद लावली होती. भाजपने यावेळी पुन्हा सत्ता हातात देण्याचे वहन मतदारांना केले आहे. तर अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील सपा आघाडीने भाजपच्या अपयशाची मोजणी करत मतदारांकडून मते मागितली आहेत. आपल्या बहुतांश सभांमध्ये अखिलेश यांनी दावा केला आहे की, निवडणुकीच्या पहिल्या तीन टप्प्यात सपा आघाडीला जोरदार पाठिंबा मिळाला असून, यावेळी निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक पराभव होईल. बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनीही अनेक रॅली घेतल्या आहेत. मायावतींनी सपा, भाजप आणि काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्याचे आवाहन मतदारांना केले आहे. फक्त बसपाच राज्यातील जनतेला खरे सुशासन देऊ शकते असे त्यांनी म्हटले आहे.
चौथ्या टप्प्यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या प्रमुख उमेदवारांमध्ये उत्तर प्रदेशचे कायदा मंत्री ब्रिजेश पाठक आहेत. जे लखनौ कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांचा सामना दोन वेळा सदस्य राहिलेले सुरेंद्र सिंग गांधी उर्फ राजू गांधी यांच्याशी होणार आहे. पाठक २०१७ च्या यूपी विधानसभा निवडणुकीत लखनौ मध्य विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. उत्तर प्रदेशचे आणखी एक मंत्री आशुतोष टंडन लखनौ पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सरोजिनीनगर विधानसभा जागेवर भाजपने रिंगणात उतरवलेले माजी ईडी अधिकारी राजेश्वर सिंह आणि सपा सरकारमधील माजी मंत्री अभिषेक मिश्रा यांच्यात लढत होणार आहे. डॉ. नीरज बोरा लखनौ उत्तर मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर दुसऱ्यांदा नशीब आजमावत आहेत. येथे त्यांची स्पर्धा विद्यार्थी नेत्या समाजवादी पक्षाच्या पूजा शुक्ला यांच्याशी आहे. यूपी विधानसभेचे उपसभापती नितीन अग्रवाल यांनाही या टप्प्यात निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे.
दरम्यान, लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणावरुन यूपीमधील राजकीय वातावरण चंगलेच तापले होते. लखीमपूर खेरी इथे चारचाकी वाहनाने शेतकऱ्यांना चिरडल्याची घटना घडली होती. यामध्ये चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी केद्रीय गृराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यावर आरोप लावण्यात आले आहेत. याप्रकरणाचे संसदेतसुद्धा पडसाद पडले होते. विरोधकांनी याप्रकरणी मंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी करत आरोपींवर कडक कारवाई करण्यची मागणी केली होती. त्यामुळे या प्रकरणाचा भाजपला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.