आरोग्य

नवी मुंबईत म्युकरमायकोसिसचे २९ रुग्ण, ४ जणांचा मृत्यू

मुंबई : कोरोना पाठोपाठ आता म्युकरमायकोसिस या आजाराने डोकंवर काढलं आहे. नवी मुंबईत या आजाराचे तब्बल २९ रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या २९ रुग्णांपैकी १४ रुग्ण हे नवी मुंबई मनपा हद्दीतील आहेत. इतर १५ रुग्ण हे नवी मुंबई बाहेरचे आहेत. या रुग्णांपैकी ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ५ रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ३ रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

संबंधित रुग्ण हे १० मे नंतर आढळले आहेत. सर्व रुग्णांवर नवी मुंबईतील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. उपचार घेणाऱ्या रुग्णांपैकी ३५ टक्के रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याचा दावा प्रश्नासनाकडून करण्यात आला आहे. कोरोनातून बरे झालेल्या काही रुग्णांना आता म्युकरमायकोसिस या घातक रोगाची लागण होताना दिसत आहे. हे प्रमाण दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. म्युकरमायकोसिस किंवा काळी बुरशी या नावाने ओळखला जाणारा हा आजार कोरोनापेक्षाही भयंकर आहे. त्यामुळे आता अनेकजण कोरोना आणि म्युकरमायकोसिसची एकाचवेळी लागण होऊ शकते का, असा प्रश्न उपस्थित करत आहेत.

वैद्यकीय तज्ज्ञांच्या माहितीनुसार, कोरोना आणि म्युकरमायकोसिसची एकाचवेळी लागण होऊ शकते. ज्या कोरोना रुग्णांची प्रकृती अतिश्य गंभीर असेल किंवा ज्यांना एडस् आणि डायबेटीस यासारख्या सहव्याधी असतील त्या रुग्णांना कोरोना आणि म्युकरमायकोसिस एकाचवेळी होऊ शकतो. तसे झाल्यास रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता अधिक असते. मात्र, सध्या भारतात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिसची लागण होताना दिसत आहे. म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार असून हवेतूनही त्याचा प्रसार होऊ शकतो. सध्याच्या घडीला तरी याचा प्रसार रोखण्याचे तितकेसे प्रभावी मार्ग उपलब्ध नाहीत. केवळ योग्य वेळेत उपचार मिळाल्यास रुग्णाचा जीव वाचू शकतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button