
पनवेल : बहुचर्चित कर्नाळा बँकेच्या शेकडो कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना मंगळवारी अटक केली. मंगळवारी रात्री त्यांच्या निवासस्थानी छापा मारून ही कारवाई करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात विशेषतः शेतकरी कामगार पक्षात खळबळ माजली आहे.
कर्नाळा सहकारी बँकेत बनावट कर्ज प्रकरणे व गैरव्यवहारांतून गेल्या काही वर्षांत ५२९ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी गुंतवणुकदारांनी दोषीवर कारवाई व्हावी, यासाठी दीर्घकाळ आंदोलन केले होते. अपहाराची व्याप्ती मोठी असल्याने सहकार खाते, स्थानिक तपास यंत्रणेसह ईडीकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर प्रमुख संशयित, शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळावर ईडीकडून मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. विवेक पाटील हे गेल्या काही महिन्यांपासून तपास यंत्रणेच्या रडारवर होते. त्यांची वाहने व मालमत्तेवर ईडीने यापूर्वीच टाच आणली असून गुंतवणूक असलेली विविध बँक खाती सील केली आहेत.

पनवेल येथे मुख्यालय असलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या ५२९ कोटींच्या घोटाळ्याला विवेक पाटील यांच्यासह त्यांच्या संचालक मंडळाला जबाबदार धरण्यात आले. कर्नाळा बँकेत ५० हजारांपेक्षा जास्त ठेवीदारांच्या ठेवी आहेत. यामध्ये पनवेल, उरणमधील स्थानिकांच्या ठेवी मोठ्या प्रमाणात आहेत. महाविकास आघाडी सरकार विवेक पाटील यांना कारवाईपासून वाचवत असल्याचा आरोप करण्यात येत होता. भाजप नेते किरीट सोमैय्या, आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह आमदार महेश बालदी हे विवेक पाटील यांच्यावर कारवाईसाठी प्रयत्नशील होते. दोन्ही आमदारांनी ठेवीदारांना घेऊन मोर्चेदेखील काढले होते.
न्यायालयाकडून अटक टाळण्यापासून संरक्षण न दिल्याने त्यांच्यावर कोणत्याही क्षणी कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मुंबई ईडी झोन-२चे सहायक संचालक सुनील कुमार यांनी मंगळवारी रात्री त्यांना पनवेल येथील निवासस्थानातून विवेक पाटील यांना ताब्यात घेतले. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.




