Top Newsराजकारण

माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात हजर

माझ्यावर आरोप करणारे पळून गेले, मी मात्र ईडीला सहकार्य करणार !

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेले आणि १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचे आरोप झालेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज ईडीच्या कार्यालयात हजर झाले. दरम्यान, ईडीच्या कार्यालयात दाखल झाल्यानंतर अनिल देशमुख यांनी एक व्हिडीओ ट्विट करत त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच आपल्यावर आरोप करणारे परमबीर सिंग हे परदेशात पळून गेले आहेत. मी मात्र ईडीला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे, असे म्हटले आहे. अनिल देशमुख आज सकाळी ईडीच्या मुंबईतील कार्यालयात हजर झाले. त्यावेळी अनिल देशमुख यांच्यासोबत त्यांचे वकील इंद्रपाल सिंह हे देखील त्यांच्यासोबत होते. आता ईडीकडून अनिल देशमुख यांच्या चौकशीला सुरुवात झाली असून, ही चौकशी अनेक तास चालण्याची शक्यता आहे.

या ट्विटमध्ये अनिल देशमुख म्हणाले की, नमस्कार मी अनिल देशमुख बोलतोय. मला जेव्हा ईडीचे समन्स आले तेव्हा मी ईडीला सहकार्य करत नाही, अशा प्रकारच्या चुकीच्या बातम्या वर्तमानपत्रामध्ये, प्रसारमाध्यमांमध्ये आल्या. मी आपल्याला सांगू इच्छितो की, जेव्हा जेव्हा मला ईडीचे समन्स आले तेव्हा, मी ईडीला कळवले की, माझी याचिका हायकोर्टात आहे. त्यावर सुनावणी सुरू आहे. मी सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल केली आहे. त्याचा निकाल आला की मी स्वत: ईडीच्या कार्यालयात हजर होईन. ईडीने जेव्हा आमच्या सर्व घरांवर छापे टाकले तेव्हा मी, माझ्या कुटुंबाने, सहकाऱ्यांनी त्यांना सहकाऱ्यांनी सहकार्य केले. सीबीआयची दोनदा समन्स आली. तेव्हा मी स्वत: सीबीआयच्या कार्यालयात गेलो आणि जबाब नोंदवला.

या व्हिडीओमध्ये अनिल देशमुख पुढे म्हणाले की, अजूनही माझा खटला सुप्रिम कोर्टात प्रलंबित आहे. मात्र आज मी स्वत: ईडीच्या कार्यालयात आलो आहे. आपल्याला माहिती आहे की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. ज्या परमबीर सिंग यांनी माझ्यावर आरोप केलेत ते परमबीर सिंग आज कुठे आहेत. याबाबतच्या बातम्या वर्तमानपत्रामध्ये आणि प्रसारमाध्यमांमध्ये येत आहेत. त्या बातम्यांनुसार परमबीर सिंग भारत सोडून परदेशात पळून गेले आहेत. म्हणजे ज्यांनी अनिल देशमुखांवर आरोप केला. ते आरोप करणारे पळून गेले. आज परमबीर सिंग यांच्याविरोधात त्यांच्या खात्यातील पोलीस अधिकारी आणि व्यावसायिकांनी गुन्हे दाखल केलेले आहेत, असे अनिल देशमुख म्हणाले.

तसेच परमबीर सिंग यांचा सहकारी असलेल्या सचिन वाझे यानेसुद्धा त्यांच्या सांगण्यावरून माझ्यावर आरोप केले होते. आज सचिन वाझे हा खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात आहे. सचिन वाझे हा त्याआधीही अनेकदा तुरुंगात होता. मी गृहमंत्री असताना सचिन वाझेला पोलीस खात्यातून काढण्याची प्रक्रिया सुरू केली होती. मी त्याला सरकारी नोकरीतून काढल्यानंतर त्याने माझ्यावर आरोप केले. अशा या परमबीर सिंग आणि सचिन वाझेंनी केलेल्या आरोपांवरून माझी जी चौकशी होत आहे. माझ्या कुटुंबाला जो त्रास दिला जात आहे. त्याच्याबद्दल मला अतिशय दु:ख होत आहे. मी सरळ मार्गाने, नैतिकतेने चालणारा माणूस, ३० वर्षांच्या कारकिर्दीत माझ्यावर एकही आरोप झाला नव्हता. पण आज जे देश सोडून पळून गेले त्या परमबीर सिंग आणि तुरुंगात असलेल्या सचिन वाझे त्यांनी आज माझ्यावर केलेल्या आरोपांची ईडी आणि सीबीआयकडून चौकशी होत आहे, याचं मला अतिशय दु:ख आहे, अशी खंतही अनिल देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button