राजकारण

डहाणूचे माजी खासदार दामोदर बारकू शिंगडा यांचे कोरोनामुळे निधन

पालघर : डहाणू लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार दामोदर बारकू शिंगडा यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते ६७ वर्षांचे होते. वसई येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान आज सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, पत्नी व नातवंडे असा परिवार आहे.

दामोदर बारकू शिंगडा हे डहाणू लोकसभा मतदारसंघातून पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले होते.ते ठाणे जिल्हा व पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष होते. दामोदर शिंगडा हे पहिल्यांदा लहान वयात खासदार झाले त्या वेळे पासून आजतागायत गांधी घराण्याशी एकनिष्ठ होते. १९८० मध्ये ते प्रथम डहाणू लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर याच मतदारसंघातून ते १९८४, १९८९, १९९१ व २००४ असे पाच वेळा निवडून आले. भारतीय काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते असलेल्या दामोदर शिंगडा यांनी १९७९ मध्ये प्रथम जिल्हा परिषदेची निवडणूक लढवून ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली.

१९८० मध्ये वयाच्या २५ व्या वर्षी ते खासदार म्हणून निवडून आले. पाच वेळा खासदार म्हणून निवडून आलेले शिंगडा हे गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे मानले जायचे. शेतीनिष्ठ शेतकरी म्हणूनही ते सर्वांना परिचित होते. त्यांनी अनेक वर्षे कॉंग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्षपदाची धुरा वाहिली होती. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांबरोबर त्यांचे जवळचे संबंध असल्याने त्यांना अजात शत्रू म्हणून ओळखले जात होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button