मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी ५ हजारांहून अधिक कोरोना रुग्ण; राज्यातही उद्रेक कायम

मुंबई : राज्यात कोरोना कहर काही थांबताना दिसत नाही आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात येत्या रविवारपासून जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात सलग तिसऱ्या दिवशी नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत ३० हजाराने वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण राज्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. गेल्या २४ तासांत ३६ हजार ९०२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ११२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर १७ हजार १९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. एकूण कोरोनाबाधितांची संख्या २६ लाख ३७ हजार ७३५वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ५३ हजार ९०७ जणांचा मृत्यू झाला असून २३ लाख ५६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी ५ हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची वाढ मुंबईत झाली आहे. गेल्या २४ तासांत ५ हजार ५१३ नव्या रुग्णांची वाढ झाली असून ९ जणांच्या मृत्यू नोंद झाली आहे.
सध्या राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.२ टक्के एवढे झाले आहे. तर मृत्यूदर २.४ टक्के एवढा आहे. एकंदरीत राज्यातील रिकव्हरी रेट कमी होत असून मृत्यूदरात वाढ होताना दिसत आहे. दरम्यान आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ९० लाख ३५ हजार ४३९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २६ लाख ३७ हजार ७३५ (१३.८६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १४ लाख २९ हजार ९९८ व्यक्ती होमक्वारांटाईनमध्ये आहेत तर १४ हजार ५७८ व्यक्ती संस्थात्मक क्वारांटाईनमध्ये आहेत. तर राज्यातील सध्याची ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या २ लाख ८२ हजार ४५१ इतकी आहे.
मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. गेल्या २४ तासांत ५ हजार ५१३ नव्या रुग्णांची वाढ झाली असून ९ जणांच्या मृत्यू नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख ८५ हजार ६२८वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ११ हजार ६२९ जणांचा मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेल्या ९ रुग्णांपैकी ७ जणांना काही दीर्घकालीन आजार होते. ७ रुग्ण पुरुष आणि २ महिलांचा यामध्ये समावेश होता. ९ रुग्णांचे वय ६० वर्षावर होते. मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार ६५८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ३ लाख ३५ हजार २६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात ४७ हजार ५०४ जणांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. आतापर्यंत मुंबईत एकूण ३८ लाख ८८ हजार ८७३ कोरोनाच्या चाचण्या झाल्या आहे.
मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७ टक्के आहे. १९ मार्च ते २५ मार्चपर्यंत मुंबईतील एकूण कोरोनाचा वाढीचा दर ०.९८ टक्के इतका आहे. तर मुंबईतील दुप्पटीचा दर ६८ दिवस आहे. मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार, सध्या सक्रिय झोन ४३ आहेत. ४९७ सक्रिय सीलबंद इमारती आहेत.