कोलकाता: पहिल्या टी-२० सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा सहा गडी राखून पराभव केला. वन डे प्रमाणे टी-२० मध्ये भारताची दमदार कामगिरी कायम आहे. भारताने तीन टी-२० सामन्याच्या मालिकेमध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे. रवी बिश्नोईचे झोकात पदार्पण अन् रोहित शर्माच्या १९ चेंडूंतील ४० धावांची आतषबाजीनं ईडन गार्डन जिंकले. सूर्यकुमारने १८ चेंडूंत ३५ धावा चोपल्या, तर वेंकटेशही २४ धावांवर नाबाद राहिला.
सूर्यकुमार यादव आणि वेंकटेश अय्यर या जोडीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. वेस्ट इंडिजने विजयासाठी दिलेलं १५८ धावांचं लक्ष्य भारताने आरामात पार केलं. भारताकडून रोहित शर्माने सर्वाधिक ४० धावा केल्या. रोहितने भारताला जबरदस्त सुरुवात करुन दिली. त्याने १९ चेंडूत ४० धावा तडकावल्या. यात ४ चौकार आणि ३ षटकार होते. त्यानंतर इशान किशनने ३५ धावा केल्या. विराट कोहली व इशान या दोघांनाही जीवदान मिळालं होतं. पण, हे जीवदान फार काळासाठी भारताच्या पथ्यावर पडले नाही. १२ व्या षटकात रोस्टन चेसने २७ धावांची भागीदारी संपुष्टात आणली. इशान ४२ चेंडूंत ३५ धावांवर माघारी परतला. त्यानंतर विंडीज कर्णधार किरॉन पोलार्डने फॅबियन अॅलेनला गोलंदाजीसाठी आणले आणि त्याने विराटची ( १७) विकेट घेतली. चार चेंडूंच्या फरकाने भारताला दोन धक्के बसले. उप कर्णधार रिषभ पंतही ( ८) लगेच माघारी परतला. रोस्टन चेसने १४ धावांत २ विकेट्स घेतल्या.विराट कोहलीने चांगली सुरुवात केली होती. पण १७ धावांवर तो अॅलेनच्या गोलंदाजीवर बाद झाला. ऋषभ पंत स्वस्तात आठ धावांवर बाद झाला. रोहितनंतर पटापट विकेट पडल्या अन् विंडीजचा संघ सामन्यात पुनरागमन करेल असे चित्र दिसू लागले. मात्र, सूर्यकुमार यादवने सुरुवातीला सावध खेळ करून स्वतःला खेळपट्टीवर स्थिरावले. भारताचा डाव अडचणीत सापडलेला असताना सूर्यकुमार यादव आणि वेंकटेश अय्यरने डाव सावरला व भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून रोहितने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजने भारताला विजयासाठी १५८ धावांच लक्ष्य दिलं होतं. वेस्ट इंडिजच्या टीममध्ये मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. मैदानावर निकोलस पूरन, मेयर्स आणि पोलार्डने तशी फटकेबाजीही केली. वेस्ट इंडिजचा संघ मोठी धावसंख्या उभारु शकला असता. पण कॅप्टन रोहित शर्माने गोलंदाजीत हुशारीने बदल करत त्यांना १५७ धावांवर रोखलं.
भुवनेश्वर कुमारने पहिल्याच षटकात ब्रेंडन किंग्सला बाद केले. ७ व्या षटकात युझवेंद्र चहलने कायल मेयर्सला ३१ धावांवर पायचीत केले. पदार्पणवीर रवी बिश्नोईने ११व्या षटकात सामन्याला कलाटणी दिली. त्या षटकात त्याने रोस्टन चेस ( ४) व रोवमन पॉवेल ( २) यांची विकेट घेतली. निकोलस पूरन एक बाजून लावून खेळत होता आणि ४३ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह ६१ धावा केल्या. वेस्ट इंडिजने २० षटकांत ७ बाद १५७ धावा केल्या. बिश्नोईने ४ षटकांत १७ धावा देताना दोन विकेट्स घेतल्या. किरॉन पोलार्ड २४ धावांवर नाबाद राहिला. हर्षल पटेलनेही ३७ धावांत २ विकेट्स घेतल्या.
भारताकडून सर्वात किफायती गोलंदाजी केली, ती रवी बिश्नोईने. त्याने ४ षटकात १७ धावा देत दोन विकेट काढल्या. डेब्यु मॅचमध्ये रवी बिष्नोईने एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट काढल्या. पॉवेलला त्याने दोन धावांवर वेंकटेशन अय्यरकरवी झेलबाद केले. त्याआधी त्याने वेस्ट इंडिजच्या रॉस्टन चेसला चार धावांवर पायचीत पकडलं व करीयरमधली पहिली आंतरराष्ट्रीय विकेट मिळवली. अन्य भारतीय गोलंदाजांनीही चांगली गोलंदाजी केली. हर्षल पटेल, रवी बिश्नोईने प्रत्येकी दोन तर भुवनेश्वर कुमार, दीपक चहर आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी एक विकेट घेतली.
रवी बिश्नोईने पदार्पणातच मोडला सचिन तेंडुलकरचा १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
रवी बिश्नोईने सचिन तेंडुलकरचा १६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. बिश्नोईने त्याच्या ४ षटकांत १७ धावा देताना २ विकेट्स घेऊन पदार्पण अविस्मरणीय बनवले. या कामगिरीसह त्याने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. भारताकडून ट्वेंटी-२० सामन्यात पदार्पणातील ही तिसरी सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. या विक्रमात प्रग्यान ओझा ( ४-२१) व अक्षर पटेल ( ३-१७) हे आघाडीवर आहेत. सचिनने ट्वेंटी-२० पदार्पणात १२ धावांत १ विकेट घेतली होती आणि तो विक्रम आज बिश्नोईने मोडला. सचिनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २००६ मध्ये ही कामगिरी केली होती.
रोहित शर्मासोबत पंगा महागात पडला !
रोहित शर्मा त्याच्या फेव्हरिट ईडन गार्डनवर पुन्हा एकदा मनमुराद फटकेबाजी करताना दिसला आणि त्यानं या फटकेबाजीसह विराट कोहली आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम यांचा विक्रम मोडला. रोहितने वेस्ट इंडिजविरुद्ध ट्वेंटी-२० स्पर्धेत सर्वाधिक ५४० धावा करणाऱ्या पाकिस्तानी कर्णधार बाबर आजमचा विक्रम मोडला. रोहितने ५४१+ धावा केल्या आहेत. याशिवाय आंतरराष्ट्रीट ट्वेंटी-२०त सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये रोहितने सहकारी विराट कोहलीला मागे टाकून दुसरे स्थान पटकावले आहे. न्यूझीलंडचा मार्टिन गुप्तील ३२९९ धावांसह अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर रोहित शर्मा ३२३१*( अजून खेळतोय) आणि विराट ( ३२२७) यांचा क्रमांक येतो.