ॲपवर झळकलेले चित्रपट कामुक, पण अश्लील नाहीत : शिल्पा शेट्टी
शिल्पाच्या 'उचापती' पतीच्यामागे आता 'ईडी'ची पीडा

नवी दिल्ली : अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती व उद्योजक राज कुंद्रा याला अश्लील चित्रपटांची निर्मिती केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या चित्रपट निर्मितीसाठी विदेशातून केलेल्या अर्थव्यवहाराची आता अंमलबजावणी संचालनालय (ईडी) चौकशी करण्याची शक्यता आहे. राज कुंद्रा याच्यावर फेमा (परकीय चलन विनिमय कायदा) या कायद्यान्वये लवकरच गुन्हा नोंदविला जाईल अशीही चर्चा आहे. दरम्यान, हॉटशॉट या ॲपवर झळकलेले चित्रपट कामुक आहेत, पण अश्लील नाहीत असा दावा शिल्पा शेट्टी हिने केला आहे.
राज कुंद्रा याच्यावर गुन्हा दाखल करण्याआधी ईडीचे अधिकारी सध्या या प्रकरणाचा अभ्यास करत आहेत असे सूत्रांनी सांगितले. मुंबई पोलिसांनी शिल्पा शेट्टीच्या निवासस्थानी छापा मारला व राज कुंद्राप्रकरणी तिची चौकशी केली. मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, हॉटशॉट ॲपशी माझा काहीही संबंध नाही. माझा पती राज कुंद्रा याचा अश्लील चित्रपट बनविण्याशी काहीही संबंध नाही. माझा मेव्हणा प्रदीप बक्षी हा हॉट शॉट ॲपचा सर्व कारभार पाहतो. हॉटशॉट ॲपचे २० लाख ग्राहक आहेत. मढ समुद्रकिनाऱ्यावरील एका बंगल्यात फेब्रुवारी २०२१मध्ये मुंबई पोलिसांनी छापा टाकून अश्लील चित्रपट आणि वेबसिरिज बनविणाऱ्यांना अटक केली होती. याच प्रकरणात राज कुंद्रा यांनाही अटक करण्यात आली.
शिल्पा शेट्टीने एका निवेदनात म्हटले आहे की, माझा पती राज कुंद्रा हा निरपराध आहे. हॉटशॉट या ॲपवर झळकलेले चित्रपट कामुक आहेत, पण अश्लील नाहीत असा दावा शिल्पा शेट्टी हिने एका निवेदनात केला होता.
राज कुंद्राच्या लॅपटॉपमधून ‘डेटा डिलीट’
उद्योगपती राज कुंद्रा आणि रायन थॉर्पे यांच्याकडून जो लॅपटॉप जप्त करण्यात आला होता, त्यामधून डेटा मोठ्या प्रमाणात डिलीट केल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. गुन्हे शाखेच्या माहितीनुसार हा डेटा राज कुंद्राच्या सांगण्यावरून हटवला गेला. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याच्या काही दिवसानंतर हा डेटा डिलीट केला गेला. या दोघांच्या लॅपटॉपवरुन जो ४८ टीबी डेटा मिळाला आहे, त्यातून क्राईम ब्रँचला अनेक महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. राज कुंद्राच्या बँक खात्याच्या तपासणीत गुन्हे शाखेला महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुंद्राच्या बँक खात्यातून अनेक वेळा परदेशी बँक खात्यात मोठ्या प्रमाणात पैशांचा व्यवहार झाला आहे.
पॉर्न फिल्म प्रकरणात गुन्हे शाखेला राज कुंद्राच्या कार्यालयात छुपे कपात सापडले आहे. काल मुंबई गुन्हे शाखेने राज कुंद्राच्या व्हियान व जेएल स्ट्रीमच्या कार्यालयात पुन्हा छापा टाकला. त्या कार्यालयात गुन्हे शाखेला एक छुपे कपाट सापडले आहे. क्राइम ब्रँचला या कपाटातून बऱ्याच बॉक्स फाइल्स मिळून आल्या आहेत. गुन्हे शाखेला त्या फाईलमधील क्रिप्टो करन्सीशी संबंधित माहिती मिळाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबई क्राईम ब्रांचकडून तिघांना समन्स
पोनोग्राफी प्रकरणी मुंबई क्राइम ब्रांचच्या प्रॉपर्टी सेलनं तीन लोकांना समन्स बजावले आहे. मॉडेल आणि टीव्ही अभिनेत्री गहना वशिष्ट (वंदना तिवारी) आणि अन्य दोघांना समन्स बजावत चौकशीसाठी बोलावलं आहे. पोर्नोग्राफी प्रकरणी ७ फेब्रुवारीरोजी गहना (वंदना तिवारी) ला अटक केली होती, आता ती जामिनावर बाहेर आहे. क्राईम ब्रांच दुसऱ्यांदा त्या सर्व आरोपींची चौकशी करणार आहे जे आरोपी या प्रकरणात आधी अटक झाले होते आणि सध्या ते जामिनावर बाहेर आहेत.




