
मुंबई : किरीट सोमय्यांना सरकारने नोटीस बजावल्यावरून ते आक्रमक झाले आहेत. मंत्रालयात माझा फोटो काढण्यासाठी जो माणूस आला होता, तो उद्धव ठाकरेंचा माणूस होता, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. मी प्रताप सरनाईकांची फाईल बघायला मंत्रालयात गेलो, प्रताप सरनाईकांनी चोरी, लबाडीने बांधकाम केलं, त्यांना दंड माफ केला, ती फाईल बघायला मी चौथ्या मजल्यावर गेलो होतो असे सोमय्या छातीठोकपणे सांगत आहेत. तसेच त्यावेळी सरनाईकांना आत येण्यासाठी मुभा कशी दिली गेली? असा सवालही सोमय्या यांनी विचारला आहे. मी वाट पाहतोय की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना चॅलेंज, हिंमत असेल तर माझ्याविरोधात गुन्हा दाखल करा, असे खुले आवाहन सोमय्यांनी ठाकरेंना दिलंय.
चौथ्या मजल्यावर फोटो काढणाऱ्या प्रताप सरनाईकांना नोटीस का नाही दिली? प्रताप सरनाईक आत आले कसे ? मी फाईल बघायला येणार हे प्रताप सरनाईकला कसं कळलं? ज्याने फोटो काढले त्यावर अद्याप कारवाई का नाही? असे एक ना अनेक सावल सोमय्या यांनी ठाकरेंना विचारले आहेत. मंत्रालयात किरीट सोमय्या गेल्यावर गुंड प्रताप सरनाईकला माझ्या मागे पाठवता, अशी गुंडगिरी आम्ही सहन करणार नाही, असेही सोमय्या म्हणाले आहेत, तसेच अनिल परब यांची खुर्ची धोक्यात आहेच, याचे परिणाम लवकरच दिसतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
बाळासाहेब ठाकरे कुठे आणि हे मुख्यमंत्री कुठे ? असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांचीही खिल्ली उडवली आहे. लिपीकावर आणि टायपिस्टवर कसली कारवाई करताय? असा सवाल त्यांनी विचारला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना माफी मागावी लागणार, अशी मागणीही त्यांनी केलीय. तसेच कोणत्या कायद्याअंतर्गत मला नोटीस पाठवली? ठाकरे सरकारची दादागिरी की ठोकशाही? काही दिवसांपुर्वी मी मुख्यमंत्री कार्यालयातल्या फाईल ही मी पाहून आलोय. सचिन वाझेच्या फाईलही मी पाहून आलो आहे. या सगळ्या अधिकाऱ्यांनी मला खुर्ची दिली तर या सगळ्यांवर कारवाई करणार का ? उद्धव ठाकरे हे आता इंग्रजांच्या प्रथा लावणार का ? असा सवाल त्यांनी विचारला आहे. तसेच इथे विषय खुर्चीचा नाही तर १८ कोटी रूपये जनतेचे गेले त्याचा आहे. मंत्रालय कोणाच्या बापाची मालकी नाहीये, फाईलच अवलोकन करायला कोणीही जाऊ शकतं, याबद्दल मरिन ड्राईव्ह पोलिस स्टेशनला तक्रार केली, केंद्र सरकारच्या गृहसचिवांकडे ही तक्रार केली आहे. मला नोटीस पाठवून माहिती अधिकार कायद्याचा भंग केला आहे, ताबडतोब नोटीस मागे घ्यावी आणि माफी मागावी, असेही सोमय्या म्हणाले आहेत.
जय पवार यांचे कारनामे उघड करणार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची १ हजार ५५ कोटींची बेनामी संपत्ती जप्त करण्यात आली आहे. आता पुढे बघा काय होतं. अजित पवार यांचा मुलगा जय अजित पवार याचे कारनामे उघड करणार आहे. तो तुरुंगात जाईल, असं खळबळजनक विधान सोमय्या यांनी केलं आहे. सोमय्या यांच्या या आरोपाने खळबळ उडालेली असून याबाबत थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारण्यात आलं. त्यावर कोण काय बोलतं याला महत्त्व देण्याची गरज नाही. या देशात नियमांचे उल्लंघन कोण करत असेल तर त्यांना आळा घालण्यासाठी कायदे आहेत, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. मात्र, सोमय्या जय पवार यांचे कोणते कारनामे उघड करणार याविषयीचे तर्कवितर्क वर्तवले जात आहेत.
किरीट सोमय्यांच्या दाव्याबाबत विचारण्यात आलं. त्यावर अजितदादांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. कायदा सर्व श्रेष्ठ असतो. या देशात नियमाचे उल्लंघन कोण करत असेल तर कायदे आहेत. कायदे पाळले जात नसतील तर खपवून घेतलं जात नाही. पण काही लोकं नुसतंच केवळ विधानं करत असतात. काही चॅनेलने तर कोणत्या दिवशी काय विधाने केली हे दाखवलं आहे. त्यामुळे अशा लोकांना अधिक महत्त्व देण्याची गरज नाही. -उद्या ते कुणाचंही नाव घेणार आणि तुम्ही प्रश्न विचाराल हे योग्य नाही. आम्हाला कुणाच्या कुटुंबीयांबाबत बोलायचं नाही, असं अजित पवार म्हणाले.