राजकारण

पोलिसांवर दबाव आणणाऱ्या अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करा : भातखळकर

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलीस बळाचा वापर करून बेकायेशीर अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकत मंत्री पदाचा गैरवापर करणाऱ्या परिवहन मंत्री ऍड.अनिल परब यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करावा अशी तक्रार भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी रत्नागिरी पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून केली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशिर्वाद यात्रेला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे पोटशूळ उठलेल्या ठाकरे सरकारने नारायण राणे यांच्याविरोधात सूडबुद्धीने केलेली अटकेची कारवाई संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली. या अटकेच्या कारवाई दरम्यान मंत्री अनिल परब यांनी रत्नागिरीचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना फोनवरून ‘कोणती ऑर्डर मागत आहे? कोर्टबाजी वगैरे होत राहील, तुम्ही पोलीस फोर्स वापरून त्याला ताब्यात घ्या’ अशाप्रकारे दबाब टाकत अटक करण्याचे आदेश दिले. न्याय्य प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हा गुन्हा आहे. या संदर्भातील चित्रफित अनेक प्रसार माध्यमांनी काल प्रदर्शित सुद्धा केली आहे.

अर्नेश कुमार खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार कलम ४१(१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीला अटक करण्यापूर्वी नोटीस देणे बंधनकारक असताना सुद्धा तशी कोणतीही नोटीस न देता नारायण राणे यांना थेट अटक करण्यात आली, हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान असून या बद्दल सुद्धा गुन्हा दाखल करावी अशी मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी तक्रारीत केली आहे. पुढील २४ तासांच्या आत मंत्री अनिल परब यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला नाही तर उच्च न्यायालयात दाद मागू व पोलिसांनी कायद्याचे पालन न केल्याबद्दल पोलिसांच्या विरोधात सुद्धा न्यायिक प्राधिकरणात तक्रार दाखल करू असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button